युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर, लोकसभेचे रणशिंग फुंकणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 01:54 PM2024-01-08T13:54:28+5:302024-01-08T13:54:51+5:30
हुपरीत मेळावा तर गारगोटीत सभा होणार
हातकणंगले : कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर ९ आणि १० जानेवारीला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे येत आहेत. बुधवार १० जानेवारी रोजी हुपरी येथे शिवसेनेचा मेळावा आहे. तो यशस्वी करूया असा निर्धार नूतन जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी केला आहे. ते हातकणंगले येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकारी बैठकीत बोलत होते.
जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी हातकणंगले येथे शिवसेना उबाठा गटाच्या आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक व युवा सैनिकांची बैठक घेऊन हुपरी येथे होणारा मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी साथ देण्याचे आवाहन केले. माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर म्हणाले सर्वांनी जुने हेवे दावे व गट तट विसरून शिवसेना म्हणजे फक्त ठाकरे हा एकच गट म्हणून उद्धव साहेबांचे हात बळकट करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत.
या बैठकीस युवासेना जिल्हा प्रमुख स्वप्निल मगदूम, मा. जि. प. सदस्य महेश चव्हाण, महिला उपजिल्हा प्रमुख सुवर्णा धनवडे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख अनिल माने, उपतालुका प्रमुख बाबासाहेब शिंगे, राजू पाटील, अनिल सुतार, मालती खोपडे, ऋतुजा सुतार तसेच तालुक्यातील सर्व शहर प्रमुख, शाखाप्रमुख, शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गारगोटीतही सभा
गारगोटी : आदित्य ठाकरे यांची गारगोटीत क्रांती चौकात दुपारी दोन वाजता सभा होणार आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडून शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे आदित्य ठाकरे काय बोलणार याकडे कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सभेला आदित्य ठाकरे यांच्याबरोबर शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर, शिवसेना उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे उपस्थित राहणार असल्याचे उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील आणि तालुका प्रमुख अविनाश शिंदे यांनी सांगितले.