अध्यक्षपदासाठी युवराज पाटील, जयवंतराव शिंपी दावेदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:18 AM2021-06-26T04:18:44+5:302021-06-26T04:18:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेच राहणार असल्याचे ग्रामविकास मंत्री ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेच राहणार असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर करून दिशा स्पष्ट केली आहे. त्यामुळे मुश्रीफ यांचे ज्येष्ठ सहकारी युवराज पाटील आणि ज्येष्ठ सदस्य जयवंतराव शिंपी हे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. अशातच शुक्रवारी सकाळी आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल यांनी शिष्टमंडळासह मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेतली.
अध्यक्षपद नेमके कोणाला यावरून गेले दोन महिने तर्कवितर्क लढवले जात होते. दोन्ही मंत्रीही याबाबत उघडपणे बोलत नव्हते. परंतु आता सहाही पदाधिकाऱ्यांचे राजीनामे झालेल्या दुसऱ्याच दिवशी मुश्रीफ यांनी थेट पत्रकार परिषदेतच अध्यक्ष राष्ट्रवादीचा असेल, अशी घोषणा केल्याने आता त्या दृष्टीने नावांची चर्चा सुरू झाली आहे.
मुश्रीफ यांचे पहिले प्राधान्य कसबा सांगावचे त्यांचे ज्येष्ठ सहकारी युवराज पाटील यांना असेल. स्वत: ग्रामविकास मंत्री असताना आपल्याच तालुक्यात अध्यक्षपद घेण्यासाठी मुश्रीफ आग्रही राहतील असे दिसते. दुसरीकडे आजऱ्याचे जयवंतराव शिंपी हे देखील यासाठी ताकद लावणार, असे दिसते. पाटील आणि शिंपी या दोघांनीही याआधी बांधकाम समितीचे सभापतिपद भूषवले आहे. दोघेही ज्येष्ठ आहेत. परंतु पाटील हे मुश्रीफ यांच्या मतदारसंघातील आहे हा त्यांच्या वजनदार मुद्दा आहे. शाहूवाडीचे विजय बोरगे आणि शिरोळ तालुक्यातील परवीन पटेल हे राष्ट्रवादीचे दोन्ही सदस्य इतर मागास दाखला असलेले आहेत. अपवादात्मक परिस्थितीमध्ये या नावांची चर्चा होण्याची शक्यता आहे.
चौकट
राहुल भेटल्यानंतर मुश्रीफ यांनी संपवला विषय
अध्यक्षांचा राजीनामा झाल्यानंतर य पदासाठी इच्छूक असलेले पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल हे शिष्टमंडळासह सकाळी ११ वाजता जिल्हा बॅंकेत मुश्रीफ यांना भेटण्यासाठी गेले. यावेळी मुश्रीफ यांनी त्यांना चार वर्षांपूर्वीच्या निवडीची आठवण करून दिली. ‘पहिल्याच वेळी आम्ही तुमचे नाव निश्चित केले होते. तुम्ही फक्त महाडिक साहेबांना कसं सांगताय ते सांगा’ एवढेच आम्ही म्हणालो होतो. परंतु त्यावेळी तुम्ही भूमिका घेतली नाही. गेल्यावेळी देखील गोव्यातून तुमचे सदस्य परत आले. ही सगळी आठवण मुश्रीफ यांनी करून दिली. तेथून ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले आणि तेथील पत्रकार परिषदेत अध्यक्ष राष्ट्रवादीचा अशी घोषणाच करून टाकली. त्याचवेळी राहुल पाटील आणि शिष्टमंडळ अजिंक्यताऱ्यावर पालकमंत्री सतेज पाटील यांच्याशी याच विषयावर चर्चा करत होते.
चौकट
आमच्यासाठी विधान परिषद महत्त्वाची
याबाबत पालकमंत्री पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो झाला नाही. परंतु कॉंग्रेसचे सदस्य जास्त आहेत. त्यामुळे या पदावर आमचा दावा आहे. मी आणि मंत्री मुश्रीफ एकत्र बसून यातून मार्ग काढू, अशी भूमिका पाटील यांनी घेतल्याचे समजते. मुश्रीफ यांच्या या घोषणेनंतर कॉंग्रेसच्या काही सदस्यांनी आपली भूमिका मांडली. त्यांच्या म्हणण्यानुसार आम्हाला सगळ्यात महत्त्वाची सतेज पाटील यांची विधान परिषद निवडणूक आहे. त्यानुसारच या सर्व हालचाली आहेत.