‘झिंगाट’वर तरुणाई ‘सैराट’
By Admin | Published: September 17, 2016 12:18 AM2016-09-17T00:18:48+5:302016-09-17T00:31:42+5:30
२५ तास मिरवणूक : ‘तेजाब’, ‘डॉन’मधील गाण्यांचीही चलती
कोल्हापूर : नव्या जुन्या, पारंपरिक आणि रिमिक्स गाण्यांच्या तालावर कोल्हापूरची तरुणाई सलग २५ तास थिरकत असल्याचे चित्र गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दिसून आले. मात्र, एकूणच मिरवणुकीवर ‘सैराट’ चित्रपटातील ‘झिंगाट’ गाण्याचा प्रभाव राहिला.
मोठ-मोठ्या डॉल्बीच्या भिंती आणि त्यावर दणाणणारी गीते हे कोल्हापूरच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य राहिले आहे. प्रत्येक वर्षी असे एखादे गाणे त्यावेळची मिरवणूक तरुणांसाठी संस्मरणीय करते असे आतापर्यंतचे चित्र आहे. यावर्षी ‘झिंगाट’च्या गाण्यावर सर्वच मंडळांच्या
कार्यकर्त्यांनी ताल धरल्याचे दिसत होते. हे गाणे रिमिक्स केल्याने तर कार्यक र्त्यांचा उत्साह वाढत होता.
‘तेजाब’मधील ‘एक दोन तीन...’पासून ते ‘मैं हूँ डॉन...’, ‘किसमें कितना हैं दम...’, ‘मेरे कॉलेज की एक लडकी हैं...’, ‘बचना ये हसींनो...’, ‘देवा श्रीगणेशा...’, ‘रेशमाच्या रेघांनी...’, ‘गढूळाच्या पाणी...’पर्यंत अनेक गाण्यांनी उपस्थितांना डोलायला लावले. अवधूत गुप्तेंच्या ‘माझं कोल्हापूर’ या गाण्यावरही अनेकांची पावले थिरकत होती. शिवरायांवरील मालिकेचे शीर्षक गीत, ‘प्यार करे सार्इंसे...’, गणपतीच्या आरत्या इथंपासून अगदी ‘अश्विनी ये ना...’, ‘शांताबाई...’ आणि ‘ब्राझील...’पर्यंतच्या गाण्यांनी मिरवणूक मार्ग दणाणून गेला होता. ज्यावेळी डॉल्बी बंद केली जात होती तेव्हा ढोलताशाच्या तालावरही नृत्य करण्याचा आनंद तरुणाईने लुटला. (प्रतिनिधी)
तालमींची स्वत:ची गाणी
शहरातील बहुतांशी बड्या तालमींनी आणि मंडळांनी स्वत:ची गाणी तयार करून घेतली होती. त्यामुळे पीटीएम, वाघाची तालीम, बीएमजी, दयावान, हिंदवी, राजे संभाजी, यु के बॉईज, रंकाळावेस यासारख्या मंडळांच्या गाण्यांवर कार्यकर्ते अधिक जोशात थिरकताना दिसत होते.