झेंडू २00, शेवंती ३00 रुपये किलो, फूल बाजार तेजीत : खरेदीसाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 03:06 PM2019-09-02T15:06:19+5:302019-09-02T15:07:59+5:30
गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला फुले खरेदी करण्यासाठी गेलेल्यांना खिशाला मोठी झळ सोसावी लागली. झेंडू २00 रुपये, तर शेवंती ३00 ते ३५0 रुपये, निशिगंध ५00 ते ६00 रुपये किलो अशा उच्चांकी दराने खरेदी करावी लागली.
कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला फुले खरेदी करण्यासाठी गेलेल्यांना खिशाला मोठी झळ सोसावी लागली. झेंडू २00 रुपये, तर शेवंती ३00 ते ३५0 रुपये, निशिगंध ५00 ते ६00 रुपये किलो अशा उच्चांकी दराने खरेदी करावी लागली. तीच परिस्थिती केवड्यासह अन्य फुलांचीही होती. दरात प्रचंड वाढ झाल्याने किलोऐवजी पावशेरवर समाधान मानून प्लास्टिकसह आर्टिफिशीयल फुलांच्या खरेदीकडे बऱ्याच जणांंनी पावले वळवली.
महापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्यांमध्ये फूल शेतीचाही समावेश आहे. १0 दिवसांहून अधिक काळ महापूर राहिल्याने फूल पीक कुजून गेले आहे. माळरानावरील पीक अतिवृष्टीने खराब झाले आहे. यामुळे गणपती सणात फुलांची टंचाई जाणवणार हे अपेक्षितच होते. मार्केटमध्येही फुलांची आवक कमी झाली आहे; त्यामुळे साहजिकच व्यापाऱ्यांनी दरातही चार पटीने वाढ केल्याचे दिसत आहे.
महालक्ष्मी मंदिर परिसरात जोतिबा मार्गावरील फूल व्यापाऱ्यांकडे फुलांची आवक बऱ्यापैकी होती. तेथे सर्वच फुले ६0 ते १५0 रुपये पावशेर अशीच विकली जात होती. निशिगंध तर फारच दुर्मीळ होता. केवडा १५0 रुपयांप्रमाणे होता. पूजा व सजावटीसाठी फुलांची आवश्यकता असल्याने ग्राहक फुले खरेदीत घासाघीस करताना दिसत होते. पूजेसाठी थोडी फुले घेऊन सजावटीसाठी मात्र आर्टीफिशीयल फुले घेण्यास प्राधान्य देत होते.