टेरेसवर फुलवली शून्य खर्चाची सेंद्रिय शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:15 AM2021-02-05T07:15:04+5:302021-02-05T07:15:04+5:30

कोल्हापूर : आवडीला थोडी कष्टाची जोड दिली की शेती आणि तीही टेरेसवर कशी उत्तम प्रकारे करता येऊ शकते, याचा ...

Zero cost organic farming flourishing on the terrace | टेरेसवर फुलवली शून्य खर्चाची सेंद्रिय शेती

टेरेसवर फुलवली शून्य खर्चाची सेंद्रिय शेती

Next

कोल्हापूर : आवडीला थोडी कष्टाची जोड दिली की शेती आणि तीही टेरेसवर कशी उत्तम प्रकारे करता येऊ शकते, याचा धडाच राजेंद्रनगरातील डॉ. तृप्ती करेकट्टी यांनी स्वप्रयोगातून घालून दिला आहे. वांगी, कारली, दोडका, भोपळा, टोमॅटो, बिन्स, कोबी, फ्लाॅवर, कांदा लसूण, अंजिर, बोर, आंबा, केळी, संत्री, मोसंबी, पेरू, अळू अशा रोज लागणाऱ्या भाज्या आणि फळांनी परसबाग लगडली आहे. विशेष म्हणजे ही सर्व शेती शून्य खर्चाची सेंद्रिय आहे. एक रुपयाचाही खर्च न करता घरातील कचऱ्यावरच ही परसबाग फुलवली आहे.

डॉ. करेकट्टी या शिवाजी विद्यापीठात इंग्रजी विभागप्रमुख आहेत. त्यांची स्वत:ची शेती मिरज व अब्दुललाटमध्ये आहे. राहायला राजेंद्रनगरात असल्यामुळे तेथेही त्यांनी बाग फुलवली. त्यांच्या या बागप्रेमाचे दर्शन गेटमधून आत प्रवेश करण्यापासूनच घडते. दोन मजले चढून वर टेरेसवर गेल्यावर तर फुललेली परसबाग पाहून मन हरखून जाते. हिरवागार कांदा, मेथी, टोमॅटोचे लागलेले गुच्छ, पांढरे शुभ्र फ्लाॅवर, कोबी नजरेत भरतात. रोजच्या खाण्यात लागणाऱ्या भाजीपाल्याच्या दोन-चार कुंड्यांतून सुरुवात झालेला हा परसबागेचा पसारा वाढत जाऊन आज जवळपास शंभरच्या वर कुंड्यांवर पोहोचला आहे. लॉकडाऊन काळात मिळालेल्या निवांतपणाचा सदुपयोग करत बागेचा पसारा आणखी वाढवला. रोप लावण्यासाठी रंगाच्या रिकाम्या बादल्यांचा वापर केला आहे.

चौकट

कचऱ्यापासून खत निर्मिती

दुधाच्या रिकाम्या पिशव्या सोडल्या, तर एक काडीचाही कचरा घराच्या बाहेर जात नाही. टेरेसवरच बॅरेल ठेवून त्यात घरातील सर्व खरकटे, कचरा, भाजीपाल्याची देठे, झाडांचा पालापाचोळा साठवला जातो. दीड महिन्याने त्याचे खतात रुपांतर झाले की तोच या कुंड्यांतील झाडांना घातला जातो. एक रुपयाचे बाहेरचे खत आणि औषधही फवारले जात नाही. एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा उत्तम नमुना येथे दिसत असल्याने भाजीपाला, फळे कीडमुक्त आहेत. शंभर टक्के सेंद्रिय खतावर ही सर्व पिके घेतली जात आहेत.

प्रतिक्रिया

कोणत्याही खर्चाशिवाय केवळ देखभालीतून आम्ही ही परसबाग तयार केली आहे. बाग लावल्यापासून एकदाही भाजीपाला बाहेरून आणलेला नाही. खर्चाच्या बचतीबरोबरच यातून मिळणारे समाधान मोठे आहे.

- डॉ. तृप्ती करेकट्टी, राजेंद्रनगर

फोटो: २८०१२०२१-कोल-परसबाग ०१, परसबाग ०२, परसबाग ०३

Web Title: Zero cost organic farming flourishing on the terrace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.