पॅकेजचा ‘एफआरपी’साठी फायदा शून्य-हसन मुश्रीफ यांची टीका : ही तर नुसती आकड्यांचीच धूळफेक; पुढील हंगामात वित्त पुरवठा अशक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 12:53 AM2018-06-08T00:53:36+5:302018-06-08T00:54:59+5:30
केंद्र शासनाने बुधवारी साखर उद्योगासाठी जाहीर केलेल्या सात हजार कोटी रुपयांच्या पॅकेजचा शेतकऱ्यांची थकीत एफआरपी देण्यासाठी काहीच फायदा होणार नाही.
कोल्हापूर : केंद्र शासनाने बुधवारी साखर उद्योगासाठी जाहीर केलेल्या सात हजार कोटी रुपयांच्या पॅकेजचा शेतकऱ्यांची थकीत एफआरपी देण्यासाठी काहीच फायदा होणार नाही. इथेनॉलसाठी जाहीर केलेले ५,८०० कोटी रुपये म्हणजे तरी निव्वळ धूळफेक असल्याची टीका कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केली. कारखाने शॉर्ट मार्जिनमध्ये गेले आहेत व ही रक्कम ९० दिवस खात्यावर राहिली तर ते खाते ‘एनपीए’मध्ये जाते व तसे झाल्यास पुढील हंगामात बँकांना कारखान्यांना वित्तपुरवठाच करता येणार नाही, अशी भीतीही मुश्रीफ यांनी व्यक्त केली.
साखर विक्रीचा किमान दर २,९०० रुपये क्विंटल निश्चित करण्याचा निर्णय मात्र दिलासा देणारा आहे. त्यामुळे यापुढे होणारे नुकसान थांबले. राज्य बँकेचे मूल्यांकनही वाढेल; परंतु माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने ही रक्कम किमान ३२०० रुपये करावी, अशी मागणी केली होती. त्यातही केंद्राने ३०० रुपये कमी केले आहेत. ही रक्कम वाढवून द्यावी यासाठी पवार, साखर महासंघाचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्या पातळीवर प्रयत्न करणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
ते म्हणाले, इथेनॉल प्रकल्पाचे विस्तारीकरण असो की नवीन उभारणी, त्यासाठी केंद्र शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाच्या एवढ्या परवानग्या घ्याव्या लागतात की, त्यासाठी किमान दोन वर्षे जातात.
‘ऋतुराज’च्या भाजप उमेदवारीबाबत खुलासा करा
कोल्हापूर : पालकमंत्री व भाजपचे नेते चंद्रकांत पाटील हे जर ‘कोल्हापूर उत्तर’मधून भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून ऋतुराज संजय पाटील यांचे नाव जाहीरपणे घेत असतील तर त्यांच्या उमेदवारीबाबत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी भूमिका जाहीर करावी व लोकांच्या मनातील संभ्रम दूर करावा, अशी अपेक्षा आमदार हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
मुश्रीफ म्हणाले, ‘मला चंद्रकांतदादांचे राजकारणात काय चाललय हेच समजत नाही. भाजप स्वबळावर लढणार म्हणून त्यांनी जिल्ह्यांतील इतक्या नेत्यांचे इनकमिंग करून ठेवले आहे की त्यांची वही आता भरली आहे. तोपर्यंत त्यांनीच परवा भाजप-शिवसेनेसोबत युती करण्यासाठी अगतिक असल्याचे दोनवेळा जाहीर केले. त्यामुळे ही युती झालीच तर इनकमिंग करून ठेवलेल्या नेत्यांचे मंत्री पाटील काय करणार आहेत..? किमान त्यांना तरी तुम्ही दिल्या घरी सुखी रहा, असा सल्ला द्यावा. युती झाल्यास शिवसेनेच्या विद्यमान आमदारांना तरी उमेदवारी द्यावीच लागेल. मग कोल्हापूर ‘उत्तर’मधून राजेश क्षीरसागर यांना थांबवून मंत्री पाटील हे ऋतुराज पाटील किंवा अन्य कोणाला उमेदवारी देणार आहेत का..? तसे होणार नसेल तर मग रोज एका नेत्याचे नाव जाहीर करून तुम्ही त्यांचे राजकीय भवितव्याचे तरी वाटोळे करू नका. ’
इंद्राचा ऐरावत लागेल..
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर शहरासाठी ५०० कोटींचा निधी आणून दाखवा, मी तुमची हत्तीवरून मिरवणूक काढतो, असे आव्हान आमदार सतेज पाटील यांनी दिले होते. त्यावर मंत्री पाटील यांनी जिल्हा नियोजन व सर्व खात्यांकडून आलेल्या निधीची आकडेवारी जाहीर केली व हत्तीवरून मिरवणूक काढा, असा सल्ला स्वत: मंत्री पाटील व आमदार सुरेश हाळवणकर हे प्रत्येक कार्यक्रमात देत आहेत.
मंत्री पाटील यांनी लावलेला हिशेब जर मी व सतेज पाटील यांच्या काळात आणलेल्या निधीसाठी लावायचा झाल्यास पाटील व हाळवणकर यांना आमच्या दोघांची मिरवणूक काढण्यासाठी इंद्राचा ऐरावत आणावा लागेल, असा टोला मुश्रीफ यांनी लगावला.
काँग्रेस आघाडीच्या काळात आम्ही दोघांनी वर्षाला दीड हजार कोटींचा निधी आणल्याचा दावा मुश्रीफ यांनी केला. भाजपच्या काळात वर्षाला हजार कोटींचा निधी आला, असे मुश्रीफ म्हणाले.