झिरो शॅडो डे: कोल्हापुरात भरदुपारी सावली ५० सेकंदांपर्यंत गायब झाली
By संदीप आडनाईक | Published: May 6, 2024 03:09 PM2024-05-06T15:09:50+5:302024-05-06T15:10:24+5:30
शास्त्रज्ञांसह खगोलप्रेमींनी घेतला अनुभव
कोल्हापूर : कोल्हापूरकरांची सावली सोमवारी दुपारी १२ वाजून २९ मिनिटे ११ सेकंदापासून ते १२ वाजून ३० मिनिटांपर्यंत म्हणजेच जवळजवळ ५० सेकंदापर्यंत गायब झाली. खगोलशास्त्राचे अभ्यासकांसह खगोलप्रेमींनी या शून्य सावली दिवसाचा अर्थात झिरो शॅडो घटनेचा अनुभव घेतला. तीन महिन्यांनी सूर्याच्या दक्षिणायन काळात ६ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी १२ वाजून ३९ मिनिटांपासून ५० सेकंदांपर्यंत परत एकदा सावली गायब होणार आहे.
कर्क वृत्त आणि मकर वृत्त या दोन वृत्तांमध्ये राहणाऱ्या लोकांना वर्षांतून दोन वेळेला या शून्य सावलीचा आनंद घेता येतो, त्यात कोल्हापुरचा समावेश असल्यामुळे सोमवारी दुपारी कोल्हापुरकरांनी शून्य सावलीचा अनुभव घेतला. शहरातील दसरा चौकात भर दुपारी १२ वाजून १९ मिनिटांनी कोल्हापुरातील अभ्यासकांनी सावधान स्थितीत उभे राहून आपली सावली गायब झाल्याचे पाहिले.
विवेकानंद महाविद्यालयातील खगोल अभ्यासक प्रा. डॉ. मिलिंद कारंजकर यांनी शास्त्रीय उपकरणांच्या सहाय्याने शून्य सावलीचा प्रयोग सहकाऱ्यांच्या उपस्थितीत अनुभवला. प्रा. कारंजकर यांनी रिट्रॉर्ट स्टॅन्ड, मेजरिंग सिलिंडर, बार मॅग्नेट, लेव्हल बॉटल, इंडेक्स पिनच्या सहाय्याने दुपारी १२ वाजून २९ मिनिटे ११ सेकंदापासून ते १२ वाजून ३० मिनिटांपर्यंत सावली गायब झाल्याचे अनुभवले.
शिवाजी विद्यापीठाच्या पन्हाळा येथील अवकाश संशोधन केंद्राचे समन्वयक डॉ. राजीव व्हटकर यांनीही सोमवारी शून्य सावली दिवस शालेय विद्यार्थ्यांसोबत अनुभवला. दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी विविध पध्दतीने शास्त्रीय प्रयोगानुसार ५५ सेकंदासाठी सावली गायब झाल्याचा अनुभव घेतला. ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे. हा दिवस पृथ्वीच्या अक्षीय कलनाशी संबंधित आहे. अनेक संस्कृतीमध्ये या दिवसाला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व आहे. पर्यटकांसाठीही हा दिवस आकर्षणाचा केंद्रबिंदू होता.