दावे सुटलेलल्या मतदारांमुळे उमेदवार, नेत्यांची डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2021 01:34 PM2021-11-21T13:34:20+5:302021-11-21T13:43:44+5:30
समीर देशपांडे कोल्हापूर : विधानपरिषदेची निवडणूक झाली की, महिन्याभरातच जिल्हा परिषदेची निवडणूक लागणार आहे. यानंतर काही कालावधीनंतर नगरपालिका आणि ...
समीर देशपांडे
कोल्हापूर : विधानपरिषदेची निवडणूक झाली की, महिन्याभरातच जिल्हा परिषदेची निवडणूक लागणार आहे. यानंतर काही कालावधीनंतर नगरपालिका आणि नगरपंचायतींची निवडणूक होणार आहे. त्यामुळे पक्ष, गट, तट, नेता याची फारशी भीती बाळगण्यापेक्षा वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याची भूमिका अनेक सदस्यांनी घेतली आहे. ज्यांना पुढच्या निवडणुकीला उभे राहण्याची संधीच नसल्याची जाणीव आहे, त्यांनी तर ताळतंत्र सोडल्याचे चित्र आहे. परंतु, हेच दावे सुटलेले मतदार दोन्ही उमेदवार आणि नेत्यांची डोकेदुखी ठरत आहेत.
ही निवडणूक अतिमर्यादित अशा मतदारांची आहे. त्यामुळे नेहमीच या निवडणुकीची वाट जिल्हा परिषद सदस्य, सभापती आणि नगरसेवक मंडळी पाहत असतात. कोल्हापूर महापालिकेच्या नगरसेवकांची मुदत संपल्याने आणि निवडणूकच न झाल्याने त्यांना या राजकीय कुंभमेळ्यात भाग घेता आला नाही. याची त्यांना मोठी सल लागली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातून सतेज पाटील यांची उमेदवारी निश्चित होतीच. परंतु, विरोधी उमेदवार शक्यतो महाडिक यांच्यातील असावा अशी अपेक्षा महाविकास आघाडीचे सदस्य, नगरसेवकही व्यक्त करत होते. ‘कुठला तरी किरकोळ उमेदवार काढला तर काय उपयोग नाही’ अशी चर्चा अनेकजण खुलेआम करत होते. झालेही तसेच. भाजपने पाटील यांच्या विरोधात अमल महाडिक यांना रिंगणात उतरवले आणि एकदम राजकीय शेअर मार्केट उसळले.
जिल्हा परिषद आणि नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुका स्थानिक राजकारणावर अवलंबून असतात. त्यामुळे त्याची भीती मतदार फारसे मनावर घेत नाहीत. काहीजणांचे गट, गण बदलणार आहेत. काहींचे आरक्षण टिकण्याची शक्यता नाही. त्यामुळे पुढचे काय, असा विचार करून मतदार थांबण्याची चिन्हे नाहीत. उलट दोन्ही नेत्यांची भेट घेत झुलवाझुलवी करत ‘आरसी म्हणजे रेट कॉन्ट्रॅक्ट’ वाढवण्याच्या कामात अनेकजण असल्याचे दिसून येत आहे.
साहेब, तुमच्या निवडणुकीवेळचं बोला
तयार झालेले मतदार आता आपल्या नेत्यालाही स्पष्टपणे सांगायला मागेपुढे बघत नसल्याचे चित्र आहे. प्रत्येक निवडणुकीत तुम्ही सांगाल तसं आम्ही करतोय; पण आता तुम्ही तुमच्या हट्टापायी आम्हाला कोणाच्या दावणीला बांधू नका. तुमच्या निवडणुकीत तुमच्याशिवाय कुठं जात नाही, असं सांगून नेत्यांचीच समजूत काढत असल्याची उदाहरणे पुढे येत आहेत.
आजऱ्याची तऱ्हाच न्यारी
- आजरा नगरपंचायतीमध्ये भाजप नेते अशोक चराटी यांच्या नेतृत्वाखाली बहुमत आहे. परंतु, काँग्रेसच्या सदस्यांना सोबत घेत त्यांचा कारभार सुरू आहे.
- जिल्हा बँकेच्या निमित्ताने तर भाजपचे चराटी आणि राष्ट्रवादीचे शिंपी यांची युती झाली आहे. त्यामुळे शुक्रवारी साेहाळे तिटट्यावर रस्त्याच्या अलीकडे भाजपच्या चराटी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सूतगिरणीत सतेज पाटील भेटले, तर रस्ता ओलांडून असलेल्या हॉटेलवर राष्ट्रवादीचे शिंपी, काँग्रेसचे नगरसेवक यांची सतेज पाटील यांनी भेट घेतली.
- अभिषेक शिंपी हे काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक आहेत हे विशेष. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे चराटी जरी भाजपचे असले तरी या नगरपंचायतीमध्ये त्यांच्यासह अन्य नगरसेवक कमळाच्या नव्हे, तर आघाडीच्या चिन्हावर निवडून आले आहेत.