जिल्हा परिषदेला ‘गोकुळ’चा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:23 AM2021-01-23T04:23:27+5:302021-01-23T04:23:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : जिल्हा परिषदेच्या आवारात उभारण्यात आलेल्या देशाचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : जिल्हा परिषदेच्या आवारात उभारण्यात आलेल्या देशाचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण समारंभासाठी ‘गोकुळ’ला निमंत्रण देण्यात आले नव्हते. जिल्ह्याची शिखर संस्था असतानाही संघाला निमंत्रण पत्रिका न दिल्याने काहीशी नाराजी व्यक्त करण्यात आली.
शासकीयसह इतर कार्यक्रमांसाठी जिल्ह्यातील शिखर संस्थांना निमंत्रित करण्याची गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. त्यानुसार जिल्हा बँक, ‘गोकुळ’, शेतकरी संघ, कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती, साखर कारखान्यांसह इतर संस्थांना निमंत्रण दिले जाते. राजकीय सोयीनुसार कार्यक्रमाला हजर राहायचे की नाही? हे तेथील नेतेमंडळी ठरवतात.
जिल्हा परिषदेच्या आवारात उभारण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. मात्र, या सभारंभाची निमंत्रण पत्रिका ‘गोकुळ’ला देण्यात आलेली नाही. ही चूक अनावधानाने झाली की राजकारणातून याविषयी जिल्हा परिषदेसह ‘गोकुळ’मध्ये जोरदार चर्चा सुरु होती.
डोंगळे, राजेश पाटील यांची उपस्थिती
‘गोकुळ’चे संचालक राजेश पाटील व अरूण डोंगळे हे यावेळी उपस्थित होते. त्यात पाटील हे आमदार असल्याने त्यांना निमंत्रण होते. डोंगळे यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे ठरवल्याने ते राष्ट्रवादीसोबत आहेत.