जिल्हा परिषदेने मागवली सौर पंपांची माहिती, ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते वृत्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 11:54 AM2019-12-06T11:54:41+5:302019-12-06T11:56:15+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील १0 तालुक्यांमध्ये बसविण्यात आलेल्या नळ पाणीपुरवठा योजनांवरील ४२ सौर पंपांची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने मागवली आहे. याबाबत ‘लोकमत’ने ‘बंद पंपातून’ ‘आॅनलाईन उपसा’ हे वृत्त प्रसिद्ध केले होते.
कोल्हापूर : जिल्ह्यातील १0 तालुक्यांमध्ये बसविण्यात आलेल्या नळ पाणीपुरवठा योजनांवरील ४२ सौर पंपांची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने मागवली आहे. याबाबत ‘लोकमत’ने ‘बंद पंपातून’ ‘आॅनलाईन उपसा’ हे वृत्त प्रसिद्ध केले होते.
जिल्ह्यातील आजरा आणि गडहिंग्लज तालुके वगळून १0 तालुक्यांमध्ये ४२ गावांतील पाणी योजनांवर महाऊर्जाकडून सौर पंप बसविण्यात आले आहेत. तीन आणि पाच अश्वशक्तीचे हे पंप असून, या माध्यमातून ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची सोय करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे; मात्र यातील काही पंप बसविताना अडचणी आल्या आहेत, काही पंपांची जागा बदलण्यात आली आहे, असे प्रकार निदर्शनास आले आहेत.
पन्हाळा तालुक्यातील पोहाळे तर्फ आळते येथे तर पंप बसविलेला नसताना आॅनलाईन यंत्रणेद्वारे मात्र पाणी उपसा सुरू असल्याचा अहवाल अधिकाऱ्यांना आला आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर खळबळ उडाली.
महाऊर्जानेही या ४२ गावांमधील सौर पंपांची नेमकी अवस्था काय आहे, हे जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषदेला पत्र दिले. यानंतर आता मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी गटविकास अधिकारी आणि ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाचे उपअभियंता यांना पत्र पाठवले असून, या ४२ गावांतील सौरपंपांच्या सध्यस्थितीचा अहवाल मागविला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात सौर पंप आस्थापित होत असताना त्याची पाहणी महाऊर्जामार्फत करण्यात आली आहे; परंतु ज्या ठिकाणी काही तांत्रिक कारणांमुळे पुरवठादाराकडून सौर पंप बसविण्यात आले नव्हते; पण तांत्रिक बाबी दूर झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या साहाय्याने आस्थापित केले जाणार होते, याची माहिती संबंधित ग्रामपंचायतींकडून या कार्यालयास वेळीच दिली गेली नाही. यातील त्रुटी लक्षात आल्यानंतर पुन्हा जिल्ह्यातील सर्व सौर पंपांची फेरपाहणी करून सुदूर सनियंत्रण प्रणालीची आवश्यकतेनुसार दुरुस्ती करण्याची मोहीम हाती घेण्याचा या कार्यालयाचा प्रयत्न आहे.
एस. ए. पाटील
विभागीय व्यवस्थापक, महाऊर्जा, कोल्हापूर