सुट्टीच्या दिवशीही जिल्हा परिषदेत धांदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:12 AM2021-02-05T07:12:01+5:302021-02-05T07:12:01+5:30
कोल्हापूर : यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत ३ आणि ४ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेची तपासणी होणार असल्याने शनिवारी सुट्टी दिवशीही ...
कोल्हापूर : यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत ३ आणि ४ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेची तपासणी होणार असल्याने शनिवारी सुट्टी दिवशीही जिल्हा परिषदेत कामाची धांदल उडाली होती.
या अभियानामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेने भाग घेतला असून, पुन्हा एकदा राज्यस्तरीय यश मिळविण्यासाठी जिल्हा परिषद सज्ज झाली आहे. त्यानुसार दिलेल्या प्रस्तावानुसार तपासणी करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे आणि सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम. एस. घुले कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर गेले चार दिवस जिल्हा परिषदेत प्रत्येक विभागाकडील अभिलेखाच्या अद्ययावत करण्याला वेग आला आहे.
गेले आठ महिने जिल्हा परिषदेच्या कारभारावर कोरोनाचे सावट होते. मात्र, या तपासणीच्या निमित्ताने सर्व विभाग आणखी सक्रिय झाले आहेत. त्यामुळेच शनिवारी सर्व विभागप्रमुख आणि कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार बोलाविण्यात आले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्यासह अधिकारीही उपस्थित होते. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई हे दोघेही १ व २ फेब्रुवारीला सोलापूर जिल्हा परिषदेच्या तपासणीसाठी जाणार आहेत.