आंदोलनामुळे जिल्हा परिषद ठप्प
By admin | Published: August 12, 2016 12:05 AM2016-08-12T00:05:31+5:302016-08-12T00:09:03+5:30
औरंगाबाद घटनेचा निषेध : हल्ले रोखण्यासाठी एकजुटीची हाक
कोल्हापूर : औरंगाबाद जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ गुरुवारी कोल्हापूर जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवले. या आंदोलनामध्ये सर्व संघटना सहभागी झाल्या होत्या. यानिमित्त राजर्षी शाहू सभागृहात घेतलेल्या निषेध सभेत, अधिकारी व कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत अनेकांनी निषेध नोंदवीत अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी सर्वांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन केले. औरंगाबाद जिल्हा परिषदेचे हल्लेखोर सदस्य संभाजी डोणगावकर यांंच्या अटकेची मागणी करण्यात आली.
औरंगाबाद जिल्हा परिषदेत सिंचनाच्या कामाच्या वाटपावरून ८ आॅगस्टला सदस्य डोणगावकर यांनी बेदमुथा यांना बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील ३२ जिल्हा परिषदांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. जिल्हा परिषदेमध्येही ‘बंद’मुळे गुरुवारी कामकाज ठप्प झाले.
जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या निषेध सभेत अनेकांनी डोणगावकर यांच्या अटकेची मागणी केली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख म्हणाले, ‘मी कर्मचाऱ्यांचा सेवक आणि पालक या नात्याने नेहमीच कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे. अशा वारंवार घडणाऱ्या घटनांबाबत अधिकारी आणि कर्मचारी यांच्या समन्वयाची बैठक बोलावून विचार करायला हवा. प्रत्येकाने स्वत:बरोबर समोरच्या व्यक्तीशीही आदर, विवेक, सभ्यता आणि न्यायाने वागल्यास अशा घटना टाळता येतील.’
उपमुख्य कार्यकारी अधिकारी व राजपत्रित अधिकारी महासंघाचे शाखाध्यक्ष चंद्रकांत वाघमारे यांनी मारहाणीची घटना लांच्छनास्पद असून, राज्य कर्मचारी संघटनेच्या आदेशानुसार आंदोलनाची पुढील दिशा ठरवू, असे सांगितले.
याप्रसंगी कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपमुख्य वित्त व लेखाधिकारी बाळासाहेब पाटील, समाजकल्याण अधिकारी सुंदरसिंग वसावे, मनीषा गुर्जर, यांच्यासह कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष सचिन जाधव, लिपिक वर्गीकरण कर्मचारी संघाचे अध्यक्ष अजय शिंदे, आबासाहेब दिंडे, आदींनीही या घटनेचा निषेध केला. संजय लोंढे यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. फारुख देसाई, माध्यमिक शिक्षण अधिकारी ज्योत्स्ना शिंदे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले, प्रकल्प संचालक
डॉ. हरीश जगताप यांच्यासह सर्व कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सर्व ंविभागांत शुकशुकाट
अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी अचानक काम बंद पुकारल्याने जिल्हा परिषदेतील कामकाज ठप्प झाले. जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचारी काम बंद ठेवून संपात सहभागी झाल्याने सर्वच विभागांत शुकशुकाट होता.
नागरिकांची गैरसोय
‘काम बंद’ पुकारल्याने ग्रामीण भागातून जिल्हा परिषदेत कामांसाठी आलेल्या अनेकांची गैरसोय झाली. या नागरिकांना काम न होताच रिकाम्या हाताने पुन्हा गावी परतावे लागले.