शाहू महाराजांच्या नावे जिल्हा परिषदेची शिष्यवृत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:23 AM2021-04-12T04:23:16+5:302021-04-12T04:23:16+5:30
कोल्हापूर : पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा देऊनही राज्य व जिल्हा यादीत येऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून जिल्हा परिषदेने राजर्षी ...
कोल्हापूर : पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा देऊनही राज्य व जिल्हा यादीत येऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून जिल्हा परिषदेने राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने रोख शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी यासाठी १२५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर एक हजार तर तालुका स्तरावर ७०० रुपये असे तीन वर्षे दिले जातील, अशी घोषणा जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी केली. स्वनिधीतून ही योजना राबवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोल्हापूर जिल्हा राज्यात शिष्यवृत्तीमध्ये अग्रेसर आहे. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन मिळण्यासाठी जिल्हा परिषद स्वनिधी मधून जे विद्यार्थी राज्य यादी व जिल्हा यादीमध्ये अयशस्वी ठरतात अशा विद्यार्थ्यांना या योजनेत समाविष्ट करून घेतले जाणार आहे जिल्हास्तर पंचवीस विद्यार्थ्यांना एक हजारप्रमाणे तीन वर्षासाठी तसेच तालुका स्तरातील संख्येनुसार सातशे रुपये तीन वर्षासाठी दिले जाणार आहेत. प्रत्येक तालुक्याला प्रतिनिधी प्रतिनिधित्व दिले आहे. ही योजना अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे. शिष्यवृत्ती समन्वयक म्हणून डी.सी. कुंभार, जयश्री जाधव, जे.टी. पाटील, एम. आय. सुतार व संजय कदम काम पाहत आहेत.
चौकट ०१
तालुका व संख्या
आजरा -६,चंदगड -६, गडहिंग्लज - ८, कागल ८, राधानगरी -८, भुदरगड ६, गगनबावडा -६, पन्हाळा -१०, शाहूवाडी -८, हातकणंगले -१२ शिरोळ-१०, करवीर-१०.
जिल्हास्तर .२५ विद्यार्थी जनरलचे असतील
प्रतिक्रिया ०१
ग्रामीण भागातील शिष्यवृत्ती मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांखेरीज ७६ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जात होती. आता यात आणखी वाढ करून ती १२५ केली आहे.
आशा उबाळे, शिक्षणाधिकारी प्राथमिक जि.प. कोल्हापूर