कोरोनातही जिल्हा परिषद शाळांचा गुणवत्तेचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:24 AM2021-08-29T04:24:28+5:302021-08-29T04:24:28+5:30
कोल्हापूर : गेल्या दीड वर्षामध्ये कोरोनामुळे शाळा ओस पडल्या. ऑनलाईन शिक्षणाची आपल्याकडे आलेली नवी पद्धत स्वीकारावी लागली. शाळाच बंद ...
कोल्हापूर : गेल्या दीड वर्षामध्ये कोरोनामुळे शाळा ओस पडल्या. ऑनलाईन शिक्षणाची आपल्याकडे आलेली नवी पद्धत स्वीकारावी लागली. शाळाच बंद राहिल्याने साहजिकच शिक्षकांची ‘चैनी’ आहे असे टोमणेही मारले गेले. परंतु, कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षणामध्येही आपले कसब दाखवून दिले. त्यामुळेच जुलै २०२१ मध्ये करण्यात आलेल्या बाह्यमूल्यांकनामध्ये १९० पैकी १६१ शाळांच्या गुणवत्तेमध्ये वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शिष्यवृत्तीमध्ये राज्यात दबदबा निर्माण करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षक, विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
गेल्यावर्षी जिल्हा परिषदेच्या १९३५ शाळांनी स्वयंमूल्यांकन केले होते. शाळांनीच आपल्या कामगिरीसाठी गुण देऊन ते जिल्हा परिषदेकडे पाठविले होते. परंतु, केवळ स्वयंमूल्यांकनावर अवलंबून न राहता कोरोना काळात नेमके अध्यापन कसे केले जाते याची खातरजमा करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी बाह्यमूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे सहकार्य घेतले. त्यानुसार स्वयंमूल्यांकनामध्ये ‘अ’ दर्जाच्या शाळांचे बाह्यमूल्यांकन करण्यात आले.
कोरोनाच्या काळामध्ये बहुतांशी शाळांमध्ये ऑनलाईन आणि दुर्गम भागामध्ये जेथे मोबाईलला रेंज नाही, तेथे सामाजिक अंतर राखून प्रत्यक्ष अध्यापन करण्यात आले. ‘शाळा बंद, शिक्षण सुरू’ हे उद्दिष्ट समोर ठेवून दीक्षा ॲपवरून दर आठवड्याला अभ्यासक्रम दिला गेला. दर शनिवारी इयत्तानिहाय विद्यार्थ्यांना प्रश्न दिले जातात. त्यासाठीचा दिलेला प्रतिसादही नोंदविण्यात आला. त्यामुळे अध्यापन, नंतर प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून तो विषय विद्यार्थ्यांना किती समजला याचीही खातरजमा करण्यात आली.
चौकट
२५ पथकांद्वारे मूल्यांकन
हे बाह्यमूल्यांकन करण्यासाठी अन्य तालुक्यातील विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुखांची २५ पथके तयार करण्यात आली. शाळांच्या ऑनलाईन अध्यापनासह अन्य बाबींचेही मूल्यांकन करण्यात आले.
चौकट
१९० पैकी १६१ शाळांच्या गुणवत्तेत वाढ
जिल्ह्यातील स्वयंमूल्यांकनामध्ये ‘अ’ दर्जा मिळविलेल्या १९० शाळांपैकी १६१ शाळांच्या गुणांमध्ये बाह्यमूल्यांकनामध्ये वाढ झाली. २५ शाळांच्या गुणांमध्ये घट झाली आणि चार शाळांचे गुण स्थिर राहिले. शाळेतील सोयी-सुविधा, अध्यापन, अध्ययन, विद्यार्थ्यांची प्रगती, प्रशिक्षणे, शालेय नेतृत्व, व्यवस्थापन समिती, लोकसहभाग या माध्यमातून हे शाळासिद्धी बाह्यमूल्यांकन करण्यात आले.
कोट
महाराष्ट्रामध्ये केवळ सातारा जिल्हा परिषदेने अशा प्रकारचे बाह्यमूल्यांकन करून घेतले आहे. याच धर्तीवर कोल्हापूर जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्यात आला, ज्यामध्ये शाळांच्या गुणवत्तेमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले.
डॉ. आय. सी. शेख
प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर
कोट
कोरोना काळामध्ये शाळा बंद असल्याने प्रत्यक्ष अध्यापनच ठप्प झाले. ऑनलाईन शिक्षणाचे वास्तव कळण्यासाठी बाह्यमूल्यांकन करण्यात आले. त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळांनी गुणवत्ता वाढ करून दाखवली आहे.
संजयसिंह चव्हाण
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर