जिल्हा परिषद सीईओंशी आशा, गटप्रवर्तक युनियनची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 11:56 AM2020-01-15T11:56:35+5:302020-01-15T11:58:46+5:30
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याशी आशा व गटप्रवर्तक युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी विविध प्रश्नांबाबत चर्चा केली.
कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याशी आशा व गटप्रवर्तक युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी विविध प्रश्नांबाबत चर्चा केली.
या आढावा बैठकीमध्ये या सर्व कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन प्रश्नांबाबत चर्चा करून यातून मार्ग काढण्याची ग्वाही मित्तल यांनी दिली. नेत्रदीपा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीसाठी सचिव उज्ज्वला पाटील, खजिनदार संगीता पाटील, उपाध्यक्ष मंदाकिनी कोडक, सुरेखा तिसंगीकर, उज्ज्वला जडे, गीता चव्हाण, अनिता गुरव उपस्थित होत्या.
पूरग्रस्त काळातील सर्वेक्षणाचे आशांना लवकर मानधन द्यावे, विधानसभा निवडणूक काळातील ज्या आशांनी वैद्यकीय पथकामध्ये मदत केली, त्यांचे समान मानधन मिळावे, माता संरक्षक कार्ड उपलब्ध करून देणे, मातृवंदना योजनेचा लाभ लाभार्थ्यांबरोबरच आशांना मिळेल, यासाठी प्रयत्न, सर्व ग्रामीण रुग्णालयांमधील कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेचे लाभ आशांना वेळेवर मिळावेत, यासाठी सिव्हिल सर्जन यांच्याशी चर्चा करणार असल्याचे यावेळी मित्तल यांनी सांगितले.
शासनामार्फत आलेले सॅनेटरी नॅपकिन विकण्याची सक्ती करू नये, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर आशा कक्षाची निर्मिती, ज्या आशांचे आधार लिंक अडचणीमुळे मानधन दिले नाही, त्यांना त्यांच्या खात्यावर मानधन जमा करणे, टीबी, पोलिओ मोहिमेचा भत्ता किमान वेतनाप्रमाणे दिला जावा, गटप्रवर्तक यांना लवकरच लॅपटॉप किंवा टॅब मिळावे, गटप्रवर्तक यांना रेकॉर्ड कीपिंगचे मानधन मिळावे, आशा संजीवनी सेस फंड वाढवा, खात्रीशीर, गरोदर मातांची थॅलेसेमिया चाचणी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये करणे, जिल्हा तक्रार निवारण समिती होईल यासाठी प्रयत्न करणार, १७-जिल्हा तक्रार निवारण समितीमध्ये संघटनेचे पदाधिकारी घ्यावेत, अशा विविध मागण्या करण्यात आल्या.