गणवेशाबाबत जिल्हा परिषदेचे शिक्षक सकारात्मक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:24 AM2021-04-06T04:24:22+5:302021-04-06T04:24:22+5:30
कोल्हापूर : गणवेशाबाबत जिल्हा परिषदेचे शिक्षक सकारात्मक असल्याची माहिती शिक्षण सभापती प्रवीण यादव ...
कोल्हापूर : गणवेशाबाबत जिल्हा परिषदेचे शिक्षक सकारात्मक असल्याची माहिती शिक्षण सभापती प्रवीण यादव आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी दिली. यादव यांनी हातकणंगले, करवीर तालुक्यातील २० शाळांना भेटी दिल्या तर उबाळे यांनी चंदगड तालुक्यातील तीन शाळांना सोमवारी भेटी दिल्या.
जिल्हा परिषदेने शिक्षकांसाठी आठवड्यातून चार दिवस गणवेश ठरवून दिला आहे. दोन दिवस पिस्ता आणि दोन दिवस गुलाबी शर्ट आणि काळी पॅण्ट असा गणवेश ठरवून देण्यात आला आहे, तर शिक्षिकांसाठी करड्या रंगाचे हाफ जॅकेट निश्चित करण्यात आले आहे. सर्व शिक्षक संघटनांशी चर्चा केल्यानंतर हा गणवेश निश्चित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर यादव आणि उबाळे यांनी शाळांचा दौरा केला.
अनेक शाळांमध्ये शिक्षकांनी गणवेश परिधान केल्याचे दिसून आले, तर अनेक ठिकाणी कपडे शिवायला टाकल्याचे शिक्षकांनी सांगितले. येत्या आठ दिवसांत बहुतांशी शिक्षक नियोजनानुसार गणवेश वापरतील, असे सांगण्यात आले.
कोट
दोन तालुक्यांतील वीस शाळांना सोमवारी भेट दिली. बहुतांशी ठिकाणी शिक्षकांनी गणवेश वापरला होता. यामुळे शाळांमध्ये एक वेगळे वातावरण निर्माण झाल्याचे पहावयास मिळाले. विद्यार्थीही आपल्या शिक्षकांकडे औत्सुक्याने पहात होते, असे चित्र दिसून आले. येत्या आठ दिवसांत सर्व शिक्षक गणवेशाचे नियोजन करतील, असा विश्वास आहे.
प्रवीण यादव
सभापती, शिक्षण समिती जिल्हा परिषद, कोल्हापूर