जिल्हा परिषद उपाध्यक्षांना धक्काबुक्की
By Admin | Published: February 19, 2015 12:26 AM2015-02-19T00:26:45+5:302015-02-19T00:31:05+5:30
‘गोकुळ’चे रणकंदन : सतेज पाटील-महाडिक संघर्ष पेटला; कणेरीवाडीतील दूध संस्था दुबार ठरावावरून अध्यक्ष, सचिवाला मारहाण
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या (गोकुळ)च्या निवडणुकीसाठी दाखल केलेल्या सुंदराबाई चव्हाण दूध संस्था, कणेरीवाडी (ता. करवीर)च्या दुबार ठरावाच्या सुनावणीवेळी सदस्यांची पळवापळव केल्याबद्दल जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत खोत यांना मोरे गटाने धक्काबुक्की व शिवीगाळ केली.
संस्थेचे अध्यक्ष अरुण मोरे व सचिव पांडुरंग खोत यांना बेदम मारहाण करीत गाडीत घालून उचलून नेल्याने सहायक निबंधक कार्यालयातील वातावरण तणावपूर्ण बनले. मोरे व खोत यांना रायगड धाबा येथे सोडून दिल्यानंतर त्यांना सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या प्रकरणातून आमदार महादेवराव महाडिक व सतेज पाटील यांच्यातील संघर्षाने पुन्हा पेट घेतली आहे.
सुंदराबाई चव्हाण दूध संस्थेवर सुरेश मोरे यांची सत्ता आहे. ‘गोकुळ’चा ठराव करताना ३ विरुद्ध ९ मतांनी सुरेश मोरे यांच्या नावावर केला होता, पण विरोधी शशिकांत खोत यांच्या गटाने संस्थेचे अध्यक्ष अरुण मोरे यांच्यासह आणखी दोन सदस्यांना आपल्याबरोबर करून दुसरा ठराव दाखल केला. दुबार ठरावाची आज सहायक निबंधक कार्यालय, ताराबाई पार्क येथे सुनावणी होती. सुरेश मोरे व त्यांचे समर्थक सकाळी दहा वाजल्यापासून निबंधक कार्यालय परिसरात हजर होते. सव्वाअकरा वाजता खोत अध्यक्ष अरुण मोरे व सचिव पांडुरंग खोत यांना आपल्या गाडीतून घेऊन आल्यानंतर मोरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गाडीचे दरवाजे उघडून अरुण मोरे व पांडुरंग खोत यांना मारतच गेटच्या बाहेर नेले. शशिकांत खोत यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, यावेळी त्यांनाही धक्काबुक्की करीत शिवीगाळ करण्यात आली. निबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी घटना शाहूपुरी पोलीस ठाण्याला कळविल्यानंतर पोलीस दाखल झाले. महाडिक गटाचे कार्यकर्ते तिथे दाखल झाल्याने निबंधक कार्यालयातील वातावरण दिवसभर तणावपूर्ण होते.
जाधव यांच्या पत्नीकडून अर्वाच्च शिवीगाळ
खोत यांच्या गटाने हिंदुराव जाधव यांना गेले तीन दिवस उचलले आहे. शशिकांत खोत तिथे आल्यानंतर जाधव यांच्या पत्नी व मुलांनी ‘माझ्या नवऱ्याला कुठे नेऊन ठेवलाय, माझे बाबा तीन दिवस कुठे आहेत’ असा जाब विचारत सचिव खोत यांना शिवीगाळ केली.
मोरे, खोत अतिदक्षता विभागात
अरुण मोरे व पांडुरंग खोत यांना मारहाण करीत उचलल्याने त्यांचा रक्तदाब वाढला. त्यामुळे सिद्धगिरी हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात ठेवले आहे.
सुरेश मोरे यांच्यासह आठजणांवर दरोड्याचा गुन्हा
शशिकांत खोत यांना अरुण मोरे गटाने धक्काबुक्की व शिवीगाळ केली. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी बुधवारी रात्री सुरेश मोरे यांच्यासह आठजणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला. संस्थेचे सचिव पांडुरंग कृष्णा खोत यांनी फिर्याद दिली आहे. संशयित सुरेश मोरे, सचिन मोरे, संदीप सुरेश मोरे, अमोल आनंदा मोरे, यशवंत शंकर मोरे, अनिल भरमा शेळके, विजय प्रकाश मोरे, वैभव प्रकाश मोरे (रा. सर्व कणेरीवाडी, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत. या संशयितांनी अडीच तोळ्यांची सोन्याची चेन, १ लाख ३५ हजार रुपये आणि कागदपत्रे लंपास केल्याचा आरोप खोत यांनी दिलेल्या फिर्यादीत केला आहे.
असे घडले राजकारण
मोरे गटाकडे सहा संचालक होते, त्यातील दोन संचालक फोडून विरोधकांनी ठराव आपल्या नावावर केला, पण मोरे गटाने ताकद लावल्याने हिंदुराव जाधव यांना खोत गटाने तीन दिवसांपूर्वी उचलले होते, तर एका संचालकाने कोणाच्याच बाजूने येणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे दोन्ही गटाकडे ४-४ संचालक राहिले, अशा परिस्थितीत संस्था अध्यक्षांचे मत निर्णायक असते. या बळावर ठराव आपल्या बाजूला करून घेण्याचा प्रयत्न खोत गटाचा होता.
रीतसर आम्ही बहुमताने ठराव दाखल केला होता, पण काही मंडळींनी चुकीच्या पद्धतीने ठराव दाखल करून निष्कारण वाद निर्माण केला. आमच्याकडे नऊपैकी सहा सदस्य आहेत.
- सुरेश मोरे
४घटनास्थळी नेमकी काय परिस्थिती घडली याबाबत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत खोत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी मोबाईल उचलला नाही.