जिल्हा परिषदेत शुकशुकाटच, निवडणुकीकडील कर्मचारी आज होणार हजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 11:25 AM2019-04-25T11:25:07+5:302019-04-25T11:27:04+5:30
लोकसभेच्या निवडणुकीच्या दुसऱ्याही दिवशी जिल्हा परिषदेमध्ये शुकशुकाट दिसून आला. मुख्यालयात असणाऱ्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी ९0 टक्के कर्मचारी निवडणूक कामावर होते. त्यांना मतदानाच्या दुसºया दिवशी अधिकृत सुट्टी असल्याने अनेक विभागांची कार्यालये ओस पडल्याचे दिसून आले.
कोल्हापूर : लोकसभेच्या निवडणुकीच्या दुसऱ्याही दिवशी जिल्हा परिषदेमध्ये शुकशुकाट दिसून आला. मुख्यालयात असणाऱ्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी ९0 टक्के कर्मचारी निवडणूक कामावर होते. त्यांना मतदानाच्या दुसºया दिवशी अधिकृत सुट्टी असल्याने अनेक विभागांची कार्यालये ओस पडल्याचे दिसून आले.
जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात ५५0 कर्मचारी कार्यरत आहेत. यातील सुमारे ५00 कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामाचे आदेश होते. वरिष्ठ १६ अधिकाऱ्यांपैकी १0 हून अधिक अधिकाऱ्यांवरही निवडणुकीची जबाबदारी दिली होती; त्यामुळे अनेक प्रमुख अधिकारी आणि बहुतांशी कर्मचारी उपस्थित नसल्याचे चित्र दिसून आले.
जिल्हा परिषदेच्या अनेक कर्मचाऱ्यांना घरी जाण्यासाठी पहाटेचे पाच वाजल्याने आता हे सर्व कर्मचारी गुरुवारीच कामावर येणार आहेत. निवडणूक जाहीर झाल्यानंतर अध्यक्षा शौमिका महाडिक आणि अन्य पदाधिकारी अपवादानेच जिल्हा परिषदेत आले होते. आता ही सर्व मंडळी आजपासून जिल्हा परिषदेत दिसतील.
जिल्हा परिषद अध्यक्ष दालनाशेजारी गटनेता अरुण इंगवले आणि पक्षप्रतोद विजय भोजे यांचे दालन आहे. सर्वपक्षीय अनेकजण याच दालनात बसून असतात; परंतु गेल्या महिनाभरामध्ये या दालनामध्ये फारसे कुणी न आल्याने येथे नेहमी कडी घातलेली असते. आज, बुधवारी मात्र विजय भोजे, विनय पाटील, सातपुते, प्रवीण यादव, मनोज फराकटे हे शिक्षण सभापती अंबरीश घाटगे यांच्या दालनामध्ये दोन्ही लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत बसल्याचे पाहावयास मिळाले.
अधिकारीही हतबल
मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवि शिवदास, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसुळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने, जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांच्यासह काही अधिकारी उपस्थित होते; मात्र अन्य कर्मचारी उपस्थित नसल्याने त्यांनाही फारसे काम करता आले नाही. गुरुवारनंतरच या कामाला गती येणार आहे.