जिल्हा परिषदेच्या लढती दुरंगी, तिरंगीच

By admin | Published: February 11, 2017 11:27 PM2017-02-11T23:27:39+5:302017-02-11T23:27:39+5:30

उमेदवारांसह नेत्यांचीही कसोटी : सर्वच पक्षांच्या सोयीनुसार आघाड्या; मोजक्याच ठिकाणी चौरंगी लढती

The Zilla Parishad's fight will be held in different parts of the city | जिल्हा परिषदेच्या लढती दुरंगी, तिरंगीच

जिल्हा परिषदेच्या लढती दुरंगी, तिरंगीच

Next

अशोक डोंबाळे --- सांगली --जिल्हा परिषदेच्या ६० जागांसाठी ७६३, तर पंचायत समितीसाठी १२८० असे २०४३ उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये वैध ठरले असले तरीही दि. १३ नंतर चित्र स्पष्ट होईल. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनसुराज्य, राष्ट्रीय समाज पक्ष व अन्य पक्ष-संघटनांच्या प्रत्येक तालुक्यात आघाड्या आहेत. या आघाड्यांमुळे निवडणूक दुरंगी, तिरंगी आणि काही ठिकाणी चौरंगी होणार आहे. राजकीय वर्चस्वासाठी नेत्यांची मात्र कसोटी लगणार आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समित्या निवडणुका म्हणजे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची रंगीत तालीमच मानली जात आहे. जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी काँग्रेसचे नेते माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, माजी मंत्री प्रतीक पाटील, राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री जयंत पाटील आणि भाजपच्या नेत्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. भाजपमध्ये नेत्यांचीच संख्या जास्त झाल्यामुळे निवडणुकीनंतर त्यांच्यातील खरी गंमत पाहायला मिळणार आहे. जिल्ह्याचे नेते त्यांच्यापैकी कोणाला मानायचे यामध्येच स्पर्धा लागणार आहे. सध्यातरी भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि खासदार संजयकाका पाटील यांच्यात नेतेपदावरून स्पर्धा रंगण्याची शक्यता आहे.
जयंत पाटील जिल्हा परिषदेतील सध्याचे ३३ संख्याबळ टिकविण्यासाठी एकहाती झुंज देत असून, त्यांना त्यांच्याच तालमीत तयार झालेले भाजपचे सेनापती रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. अनेक तालुक्यात एकाचवेळी त्यांना अनेकांशी टक्कर द्यावी लागत आहे. काँग्रेसच्या नेत्यांना जिल्हा परिषदेचा गड मिळविण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. पण, त्यादृष्टीने त्यांच्या नेत्यांचा एकसंधपणा दिसत नसल्यामुळे त्यांचे मावळे सैरभैर झाले आहेत. सर्वच पक्षांनी सत्तेची स्वप्ने बाळगली असली, तरी प्रत्येकाला विविध समस्यांनीही ग्रासले आहे. विचित्र राजकीय परिस्थितीत ही लढाई लढली जात असल्याचे चित्र दिसत आहे.
शिराळा, पलूस, कडेगाव, खानापूर, कवठेमहांकाळ तालुक्यात दुरंगी, तर वाळवा, आटपाडी, मिरज, तासगाव, जत तालुक्यात तिरंगी लढतीची शक्यता आहे. संपूर्ण चित्र अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीनंतर म्हणजे दि. १३ फेब्रुवारीनंतरच स्पष्ट होणार आहे.


जतमधील लढती : तिरंगी, चौरंगी
जत तालुक्यातील जाडरबोबलाद, उमदी, संख, दरीबडची, मुचंडी, बनाळी या जिल्हा परिषद गटात भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी, तर शेगाव गटात भाजप, काँग्रेस, वसंतदादा विकास आघाडी, राष्ट्रीय समाज पक्ष आणि बिळूर गटात भाजप विरुध्द काँग्रेस अशी लढत होत आहे. डपळापूर गटात खिचडी झाली असून, येथे सर्वाधिक उमेदवार रिंगणात आहेत. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी-वसंतदादा विकास आघाडी, शिवसेना, राष्ट्रीय समाज पक्ष व शेतकरी संघटना आघाडी, जय मल्हार विकास आघाडी आणि अपक्षांचे परिवर्तन पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात आहे.

शिराळा तालुक्यात दोन्ही काँग्रेस विरुध्द भाजप
शिराळा तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट आणि आठ पंचायत समिती गणांमध्ये सरळ भाजप विरुध्द काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असा दुरंगी सामना रंगला आहे. कोकरूड गटातून काँग्रेस राज्य सरचिटणीस आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख (काँग्रेस) विरुध्द हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचे पुतणे पुनवतचे माजी सरपंच अमर माने (भाजप) अशी लक्षवेधी लढत होत आहे. मांगले गटातील लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. राष्ट्रवादीकडून आश्विनी राजेंद्र नाईक, त्यांच्या विरोधात त्यांच्याच कुटुंबातील भाजपकडून अनन्या वीरेंद्र नाईक अशी लढत होत आहे. वाकुर्डे बुद्रुक पंचायत समिती भाजपकडून सत्यजित शिवाजीराव नाईक, राष्ट्रवादीकडून शिराळा पंचायत समितीचे माजी सभापती सम्राटसिंह नाईक यांच्यात अस्तित्वाची लढत आहे. पणुंब्रेतर्फ वारूण गटातून काँग्रेसकडून शारदा हणमंतराव पाटील यांच्याविरोधात भाजपकडून आरळ्याचे उपसरपंच एन. डी. लोहार यांच्या पत्नी लक्ष्मी नारायण लोहार, वाकुर्डे बुद्रुक गटात राष्ट्रवादीकडून आशा विजय झिमुर आणि भाजपकडून सुरेखा विजय कांबळे अशी सरळ लढत आहे.


आटपाडीत आघाड्यांवरच लढतीचे चित्र
माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आटपाडी तालुक्यातील लढतीचे चित्रच बदलले आहे. भाजप-राष्ट्रवादीत रंगणारा सामना आता भाजप विरुध्द शिवसेना-काँगे्रस-राष्ट्रवादी आघाडीत रंगण्याची चिन्हे आहेत. तीनही पक्षांची आघाडी करण्यासाठी काँग्रेसचे नेते माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, शिवसेनेचे नेते आमदार अनिल बाबर यांचे प्रयत्न चालू असून, राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जयंत पाटील यांचाही याला हिरवा कंदील मिळाला आहे. आघाडी फिसकटल्यास आटपाडी तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट आणि आठ पंचायत समिती गणात तिरंगी सामना रंगण्याची शक्यता आहे. खरसुंडी गट खुला असल्यामुळे या जागेवरच सर्वच तालुक्यातील आणि जिल्ह्यातील नेत्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे.


मिरजेत काँग्रेसला गटबाजीचे ग्रहण
मागील जिल्हा परिषद निवडणुकीत मिरज तालुक्यातील दहा जागांपैकी सात जागांवर काँग्रेसने विजय मिळविला होता. यावेळी मिरज तालुक्यात समडोळी एक गट वाढला आहे. तरीही पूर्वीच्या जागा टिकविण्याचे काँग्रेसपुढे आव्हान आहे. काँग्रेस पक्षातील नेत्यातील गटबाजीत त्यांनी वाट्टेल त्यापध्दतीने राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अजितराव घोरपडे गटाबरोबर आघाडी केली आहे. यामुळे या मित्र पक्षांनाच समडोळी, कवठेपिरान, मालगाव, आरग, म्हैसाळ असे पाच गट सोडले आहेत. उर्वरित सहा जागांवर काँग्रेस लढत आहे. कवलापूर, बुधगाव येथे भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.


कडेगावमध्ये कदम-देशमुख गटातच लढत
कडेगाव तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट आणि आठ पंचायत समिती गणांपैकी कडेपूर गणात भाजपचे पृथ्वीराज देशमुख यांचे वर्चस्व होते. उर्वरित तीन गटात त्यांनी राष्ट्रवादीला बरोबर घेऊन पक्षाची नव्याने बांधणी करून काँग्रेसचे नेते डॉ. पतंगराव कदम गटाला आव्हान दिले आहे. कडेगाव तालुक्यातील सर्वच गट आणि गणांमध्ये कदम विरुध्द देशमुख गटातच लढत होणार आहे.
कवठेमहांकाळमध्ये काका-सरकारांची प्रतिष्ठा पणाला
कवठेमहांकाळ तालुक्यातील चार जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समिती गणांपैकी ढालगाव गटात राष्ट्रवादी-माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाविरोधात भाजप-काँग्रेस आणि अपक्ष अशी बहुरंगी लढत आहे. कुची, देशिंग आणि रांजणी गटात भाजप-काँग्रेस विरुध्द राष्ट्रवादी अशी दुरंगी लढत होणार आहे. देशिंग गटात राष्ट्रवादी बंडखोर उमेदवार सुरेखा कोळेकर यांनी राष्ट्रवादी-घोरपडे गटापुढे आव्हान उभे केले आहे. येथे राष्ट्रवादी बंडखोरांना भाजपचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.
वाळवा तालुक्यात दुरंगी, तिरंगी
वाळवा तालुक्यातील अकरा जिल्हा परिषद गटांपैकी कासेगाव, कामेरी, चिकुर्डे, पेठ, वाटेगाव गटांमध्ये राष्ट्रवादी, रयत विकास आघाडी, शिवसेना अशी तिरंगी, तर वाळवा, येलूर, रठरेहरणाक्ष गटात राष्ट्रवादीविरोधात रयत विकास आघाडी असा दुरंगी सामना रंगणार आहे. बोरगाव गटात मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी, रयत विकास आघाडी, शिवसेना अशी चौरंगी लढत आहे. बागणी गटातही चौरंगी लढत असून, तेथे राष्ट्रवादी बंडखोराचे आव्हान आहे. वाळवा तालुक्यात आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात सर्वपक्षीय आघाडी करण्यात कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत, आमदार शिवाजीराव नाईक, नानासाहेब महाडिक यांना अपयश आल्यामुळे शिवसेना व काँग्रेस स्वतंत्र लढत आहे.


पलूसला लक्षवेधी
पलूस तालुक्यात चार जिल्हा परिषद गट आणि आठ पंचायत समिती गण असून, येथे भाजप-राष्ट्रवादी-स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडी विरुध्द काँग्रेस अशी सरळ दुरंगी लढत आहे. कुंडल गटात राष्ट्रवादीचे शरद लाड विरुध्द काँग्रेसचे महेंद्र लाड, भिलवडी गटामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील (काँग्रेस) विरुध्द सुरेंद्र वाळवेकर (भाजप) अशी दुरंगी लक्षवेधी लढत होत आहे. अंकलखोप गटातही भाजपच्या उमेदवारांनी काँग्रेससमोर कडवे आव्हान निर्माण केले आहे. याठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. येथेही दुरंगीच सामना होणार आहे. भाजपने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला वसगडे पंचायत समिती गणाची जागा सोडली आहे. राष्ट्रवादीने कुंडल गट आणि दोन पंचायत समित्या जागा घेऊन उर्वरित ठिकाणी भाजपला पाठिंबा दिला आहे.

Web Title: The Zilla Parishad's fight will be held in different parts of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.