जिल्हा परिषद करणार प्राथमिक शाळांचे ‘मार्केटिंग’
By admin | Published: May 26, 2015 12:28 AM2015-05-26T00:28:28+5:302015-05-26T00:47:45+5:30
सोशल मीडियाचा होणार वापर : चांगल्या शाळांचे चित्रीकरण, व्हॉटस् अॅपवर क्लिप टाकणार
भीमगोंडा देसाई - कोल्हापूर स्पर्धेत टिकण्यासाठी आणि पटसंख्या वाढविण्यासाठी येत्या जून महिन्यात आपल्याकडील प्राथमिक शाळांचे ‘मार्केटिंग’ करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. ‘राजर्षी शाहू शिक्षण समृद्धी’ कार्यक्रमांतर्गत उपक्रमशील आणि सर्व दृष्टीने दर्जेदार शाळांचे चित्रीकरण केले आहे. १२ मिनिटांची ही क्लिप सोशल मीडियावर, तसेच व्हॉटस् अॅपवर टाकून अधिकाधिक पालकांपर्यंत शाळांची प्रगती पोहोचविण्यात येणार आहे.
जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंतच्या एकूण २००५ शाळा जिल्हा परिषदेच्या अखत्यारित चालतात. दरम्यान, दिवसेंदिवस इंग्रजी माध्यमातील शिक्षणाला अवास्तव महत्त्व आले आहे. सरकारी शाळांत दर्जेदार शिक्षण आणि सेवा, सुविधा मिळत नाहीत, असा समज आहे. त्यामुळे अलीकडे खासगी, इंग्रजी शाळेत पाल्याला दाखल करण्याकडे पालकांचा कल वाढला आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील पटसंख्या झपाट्याने घसरत आहे. अनेक शाळांत पहिलीच्या वर्गात हाताच्या बोटावर मोजण्याइतकी मुले आणि मुली आहेत. परिणामी, अनेक शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे किमान गरीब, सर्वसामान्य, बहुजन या वर्गातील मुलांसाठी जिल्हा परिषदेच्या शाळा वाचविणे काळाची गरज आहे. म्हणून उशिरा का होईना, जिल्हा परिषद गुणवत्ता सुधारण्यासाठी हा उपक्रम राबवत आहे.
यंदाच्या जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात राजर्षी शाहू शिक्षण समृद्धी कार्यक्रमातून सर्व शाळांमध्ये गुणवत्ता आणि सर्वांगीद सुविधा देण्यासाठी १ कोटींची स्वनिधीतून तरतूद केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून चांगल्या शाळांचे मार्केटिंग केले जाणार आहे. राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा, टिटवे, तुरंबे, फेजिवडे, सरवडे, तर आजरा तालुक्यातील मडिलगे बुद्रुक, हरपवडे, शिरोळ तालुक्यात नांदणी, हातकणगंलेतील मिणचे, लाटवडे, करवीरमधील सरनोबतवाडी या विद्यामंदिर शाळांतील आणि शिंगणापूर निवासी शाळेचे डॉक्युमेंटरीसाठी चित्रीकरण केले आहे. दहा मिनिटांची डॉक्युमेंटरी तयार केली जाणार आहे. त्यातील दोन मिनिटांची क्लिप सोशल मीडियावर टाकण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियालाही देण्यात येणार आहे.
कल्पकता आणि तंत्रज्ञानाच्या वापरातून तयार केलेली डॉक्युमेंटरी प्रत्येक शाळेत व विद्यार्थी, पालक मेळाव्यात दाखविण्यात येणार आहे. खासगी शाळांपेक्षा जिल्हा परिषदेच्या शाळा सर्वच बाबतीत कशा सरस आहेत, याची जागृती केली जाणार आहे. जून महिन्यात सर्व शाळेत ही डॉक्युमेंटरी दाखविण्यात येईल.
- अभिजित तायशेटे, सभापती, शिक्षण विभाग
सर्वच शाळांतील गुणवत्ता वाढावी, यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. यंदा पटसंख्या वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे चांगल्या शाळांची कामगिरी सर्वच शाळेत पोहोचविण्यासाठी डॉक्युमेंटरी तयार केली आहे.
- स्मिता गौड,
प्राथमिक शिक्षणाधिकारी