झिम्मा-फुगडीचा खेळ रंगला...
By admin | Published: October 5, 2015 12:38 AM2015-10-05T00:38:24+5:302015-10-06T00:41:45+5:30
बारा हजार महिलांचा सहभाग: भागीरथी महिला संस्थेचे आयोजन
कोल्हापूर : पारंपरिक वेशभूषेमुळे खुलून दिसणारा मराठमोळ्या सौंदर्याचा थाट, पारंपरिक गीतांच्या तालावर धरलेला फेर, प्रोत्साहनासाठी हजारो टाळ्यांचा गजर अशा वातावरणात हजारो महिलांचा झिम्मा-फुगडीचा खेळ रंगला. निमित्त होते धनंजय महाडिक युवाशक्ती महिला आघाडी प्रेरित, भागीरथी महिला संस्था आयोजित झिम्मा फुगडी स्पर्धेचे.
मुस्कान लॉनवर आमदार संध्यादेवी कुपेकर, मंगलताई महाडिक, जिल्हा परिषदेच्या सदस्या शौमिका महाडिक, वैशाली क्षीरसागर, संगीता शेट्टी, मौसमी आवाडे, अकलूजच्या सविता वोरा, पंचायत समितीच्या सदस्या अरुणिमा माने आणि भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांच्या उपस्थितीत स्पर्धेला प्रारंभ झाला. यावेळी महाडिक यांनी युवतींच्या सक्षमीकरणासाठी भागीरथी युवती मंच स्थापन करण्यात आल्याची घोषणा केली. तसेच कोल्हापूर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी संस्थेच्या वतीने कापडी बॅगा बनवून त्या वितरित करण्यात येणार आहेत. त्यासाठी महिलांनी जुन्या साड्या, कपडे दान करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. सकाळी आठ वाजल्यापासून रंगलेल्या या स्पर्धेत नटूनथटून, कोल्हापुरी साज-नथ-बिंदी अशा आभूषणांनी सजून, नऊवारी साडीत आलेल्या महिला झिम्मा-फुगडी, काटवटकणा, उखाणे, छुई-फुई, घागर घुमविणे, सूप नाचविणे अशा विविध पारंपरिक लोककला आणि खेळांमध्ये दंग झाल्या. दरम्यान, खासदार धनंजय महाडिक यांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. ‘झी मराठी’वरील ‘नांदा सौख्यभरे’ या मालिकेमधील इंद्रनील म्हणजे चिन्मय उदगीरकर आणि स्वानंदी म्हणजे ऋतुजा बागवे या जोडीने स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थिती लावून, महिलांचा उत्साह द्विगुणित केला. या स्पर्धेसाठी एकूण पाच लाख रुपयांची बक्षिसे होती. सहभागी प्रत्येक महिलेला प्रमाणपत्र देण्यात आले. अनेक महिलांनी आपल्या खेळातून लेक वाचवा, झाडे लावा, प्रदूषण टाळा असा सामाजिक संदेश दिला. ‘चॅनल बी’च्यावतीने स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. रात्री उशिरा बक्षीस वितरण सोहळा झाला. ( प्रतिनिधी)