झीप क्वॉईनची व्याप्ती ६५ कोटींपेक्षा अधिक -३८ जणांची बँक खाती सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 12:59 AM2018-05-03T00:59:51+5:302018-05-03T00:59:51+5:30
कोल्हापूर : झीप क्वॉईनमध्ये गुंतवणूकदारास महिन्याला लाखो रुपयांचा फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखविणाऱ्या भामट्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यांतील ५०० हून अधिक गुंतवणूकदारांची ६५
कोल्हापूर : झीप क्वॉईनमध्ये गुंतवणूकदारास महिन्याला लाखो रुपयांचा फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखविणाऱ्या भामट्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यांतील ५०० हून अधिक गुंतवणूकदारांची ६५ कोटींची फसवणूक केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. कंपनीचे अनिल नेर्लेकर, राजेंद्र नेर्लेकर, संजय कुंभार यांच्यासह ३८ जणांची बँक खाती पोलिसांनी सील केली, तर संशयितांकडून दोन आलिशान कार जप्त केल्या आहेत.
संशयितांनी झीप क्वॉईनचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना आपल्या कंपनीत पैसे गुंतविण्यासाठी महाराष्ट्रातील मोठे जिल्हे, कर्नाटक आणि गोवा येथील एजंटांची साखळी तयार केली. एजंटांना
२० ते ३० हजार रुपये पगार देऊन जास्तीत जास्त गुंतवणूकदारांना कंपनीपर्यंत आणण्यासाठी उद्दिष्ट दिले. गुंतवणूकदारांवर प्रभाव पाडण्यासाठी ते आलिशान
वाहनातून फिरणे व पंचतारांकित हॉटेलमध्ये सेमिनार घेतले जात होते. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, निपाणी, बेळगाव, गोवा या ठिकाणच्या बड्या उद्योजकांनी या कंपनीत लाखो रुपये गुंतविले आहेत. संचालकांनी गुंतवणूकदारांसह परदेशवारी केल्याचे तपासात पुढे आले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे
पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी दिली.कंपनीच्या कार्यालयावर छापा टाकल्यानंतर पोलिसांना मिळालेल्या कागदपत्रांनुसार गुंतवणूकदारांची यादी तयार केली जात आहे. कंपनीच्या कार्यालयातून संगणकाची हार्डडिस्क, लॅपटॉप, पावती पुस्तके, बँकेची पासबुके जप्त केली आहेत. त्यातून गुन्हा दाखल असणाºया तिघांसह इतर सहा संशयितांची बँक खाती सील करण्यासाठी पोलिसांनी जिल्ह्णातील सर्व बँकांना पत्रे पाठविली आहेत तसेच इतर राज्यांतील बॅँकांतही पत्रे पाठवण्याचे काम सुरू आहे. अटकेतील तिघांच्या घरांची पोलिसांनी झडती घेतली. त्यामध्ये काही महत्त्वाची कागदपत्रे हाती लागली आहेत. अटक तिघांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्यांच्या पोलीस कोठडीत ५ दिवसांनी वाढ करण्यात आली.
परजिल्ह्यातील तक्रारदारांचाही पुढाकार
फसवणूक झाल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच कोल्हापूर, सांगली, सातारा व रत्नागिरी येथील १० तक्रारदार पुढे आले आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून कागदपत्रे घेऊन जबाब नोंदविले आहेत.
जमीन, सोन्यात गुंतवणूक
संशयितांनी गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत फसवणुकीतील रक्कम त्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह प्लॉट, फ्लॅटमध्ये गुंतवणूक केल्याचे समजते. त्या मालमत्तांच्या शोधासाठी पोलीस नातेवाईकांकडेही चौकशी करणार आहेत.