‘झेडपी’तील तक्रारींची १५ दिवसांत निर्गत
By admin | Published: April 20, 2017 01:27 AM2017-04-20T01:27:50+5:302017-04-20T01:27:50+5:30
शौमिका महाडिक : सर्व विभागांचा घेतला आढावा; स्वतंत्र तक्रारवहीचे नियोजन
कोल्हापूर : जिल्हा परिषदेबाबतच्या सर्व तक्रारींची १५ दिवसांत निर्गत लावली जाईल. त्यासाठी स्वतंत्र तक्रार वही घालून त्या तक्रारी सोडविण्यासाठी जबाबदारी अधिकाऱ्यांवर टाकली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शौमिका महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सलग चार दिवस महाडिक यांनी सर्वच विभागांच्या आढावा बैठका घेतल्या असून, यामध्ये अतिशय तपशीलवार सादरीकरण पाहिले आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी दुपारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, बाराही तालुक्यांतून लांबून येणाऱ्यांची कोणत्याही परिस्थितीत दखल घेतली गेली पाहिजे. त्यासाठी अधिकारी जागेवर नसतील तर किमान त्या विभागाच्या अन्य कुणीतरी त्यांच्या कामाबाबत चर्चा केली पाहिजे. कुणालाही वारंवार फेऱ्या माराव्या लागणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
सर्वच विभागांच्या एकूण १२२ योजनांबाबत या बैठकांमध्ये सादरीकरण करण्यात आले. अतिशय मूलभूत असा हा आढावा घेण्यात आला. महत्त्वाची कोणतीही कामे प्रलंबित आहेत ती १५ दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचतो का याचीही खात्री करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
शिक्षण विभागाबाबत सातत्याने काही तक्रारी असतात. शासनाचे आदेशही सातत्याने बदलत असतात. यामध्ये अधिकाऱ्यांनाही मर्यादा पडतात. परंतु, स्वतंत्र शिबिरे घेऊन शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले आहेत. कलाकारांच्या मानधनाचा प्रश्नही निकालात काढण्यात येणार आहे. प्रशासनानेही कोणता महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करावी, अशी अपेक्षा आहे. पदाधिकाऱ्यांच्या स्वीय सहायकांच्या नेमणुकाही लवकरच होतील.
शुक्रवारी पंचगंगा प्रदूषण आणि जिल्ह्यातील पाणीटंचाईसाठी विशेष बैठक आयोजित केली आहे. सोमवारी आणि शुक्रवारी अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेत थांबावे, अशी येथील प्रथा आहे. ती गांभीर्याने पाळण्याबाबतही सूचना दिल्या आहेत. जरी अधिकारी फिरतीला, बैठकीला बाहेर गेले असतील तरी त्या विभागाच्या इतरांनी आपल्या कामासाठी येणाऱ्यांना घालवून देण्यापेक्षा त्यांचे काम काय आहे याची चौकशी करून त्याला माहिती दिली पाहिजे.
‘आजच्या निवडी सर्वसंमतीने होतील’
आज जिल्हा परिषदेच्या विषय समिती सदस्यांच्या निवडी आहेत.
त्यामध्ये सर्वसमावेशक धोरण ठेवल्याने या निवडी सर्वसंमतीने होतील.
यात काही फार अडचण येणार नाही, असे शौमिका महाडिक यांनी सांगितले.