मुंबईच्या निवडीवरच जि.प.चा फैसला
By admin | Published: March 2, 2017 01:17 AM2017-03-02T01:17:41+5:302017-03-02T01:17:41+5:30
अध्यक्ष निवड : उद्धव ठाकरे आज कोल्हापुरात; चंद्रकांतदादांच्या भेटीविषयी उत्सुकता
कोल्हापूर : मुंबई महानगरपालिकेचा महापौर कोण होणार, हे आता आठ मार्चला स्पष्ट होणार असल्याने त्याच दिवशी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सत्तेचा निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज, गुरुवारी संध्याकाळी कोल्हापुरात येणार आहेत. तर महसूल मंत्री व भाजपचे नेते चंद्रकांतदादा पाटील हे रात्री कोल्हापुरात दाखल होणार आहेत. त्यामुळे या दोघांची गुरुवारी रात्री किंवा शुक्रवारी
सकाळी भेट होणार का याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
मुंबई महापालिकेतील संख्याबळामुळे सत्तेची विचित्र कोंडी निर्माण झाली आहे. शिवसेना आणि भाजप या नैसर्गिक मित्रपक्षांना एकत्र यावे लागेल, असे वातावरण असताना दिल्लीतूनही सबुरीने घेण्याचा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला आहे. आठ मार्चला ही महापौर निवड होणार असल्याने त्या दिवशी जर भाजप-शिवसेना एकत्र आली तर मग कोल्हापूर जिल्हा परिषदेतही शिवसेना-भाजप युतीची सत्ता येईल यात शंका नाही. मात्र, अजूनही मुंबईतील चित्र स्पष्ट नसल्याने कोल्हापूरबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे हे आज, गुरुवारी दुपारी साडेचार वाजता कोल्हापुरात येणार आहेत. कोल्हापूर विमानतळावर साडेचार वाजता त्यांचे आगमन होईल. अंबाबाई दर्शन आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मुलाच्या विवाह समारंभास उपस्थिती, असा त्यांचा कार्यक्रम असून गुरुवारी त्यांचा कोल्हापुरात मुक्काम आहे. शुक्रवारी सकाळी आठनंतर ते मुंबईला रवाना होणार आहेत. (प्रतिनिधी)
गुरुवारी रात्री वा शुक्रवारी भेटीची शक्यता
उद्धव ठाकरे दुपारी कोल्हापुरात येणार असताना महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे देखील औरंगाबाद येथून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुलाच्या विवाहप्रसंगी उपस्थित राहून रात्री साडेदहाला कोल्हापुरात येणार आहेत. भाजप आणि शिवसेनेतील प्रमुख समन्वयक म्हणून पहिल्यापासून चंद्रकांतदादा जबाबदारी सांभाळत आहेत. कायमस्वरूपी राजकारण डोक्यात न ठेवता राजकीय क्षेत्रातही ‘मैत्रीसंबंधांना महत्त्व देणारे मंत्री’ म्हणून चंद्रकांतदादांची ओळख आहे. सध्याच्या राजकीय कोंडीच्या पार्श्वभूमीवर आपल्या गावात आलेल्या ठाकरे यांची चंद्रकांतदादा भेट घेणार का, याबाबत उत्सुकता आहे. दोघांनी ठरवल्यास गुरुवारी रात्री किंवा शुक्रवारी सकाळी ही भेट होऊ शकते. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये याबाबत औत्सुक्य आहे.