ZP Election kolhapur- पी. एन. यांच्या आग्रहामुळे निवडीमध्ये पेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 12:10 PM2021-07-10T12:10:41+5:302021-07-10T12:12:33+5:30
ZP Election : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आमदार पी. एन. पाटील हे चिरंजीव राहुल यांच्यासाठी आग्रही असल्याने नवा पेच निर्माण झाला आहे. त्यातून आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील काय मार्ग काढतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राहुल पाटील उमेदवार नसतील तर आम्हाला गृहित धरू नका, अशी भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही सदस्यांनी घेतल्याचा दावा पी. एन. यांच्या गटाकडून केला जात आहे.
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आमदार पी. एन. पाटील हे चिरंजीव राहुल यांच्यासाठी आग्रही असल्याने नवा पेच निर्माण झाला आहे. त्यातून आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील काय मार्ग काढतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राहुल पाटील उमेदवार नसतील तर आम्हाला गृहित धरू नका, अशी भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही सदस्यांनी घेतल्याचा दावा पी. एन. यांच्या गटाकडून केला जात आहे.
सर्वांत आधी तीन महिन्यांपूर्वीच पी. एन. यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन राहुल यांना अध्यक्षपदाची संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. राहुल पाटील यांनी गेल्या आठवड्यात जिल्हा बँकेत मुश्रीफ यांची तर अजिंक्यतारावर सतेज पाटील यांची भेट घेतली होती. मात्र, अर्ध्या तासांतच मुश्रीफ यांनी अध्यक्ष राष्ट्रवादीचा असेल, अशी घोषणा केल्याने युवराज पाटील यांचे नाव चर्चेत आले. सतेज पाटील यांनीही काँग्रेसने अध्यक्षदावरील दावा सोडला नसल्याचे स्पष्ट केल्याने आणखी संभ्रम वाढला.
अशातच राहुल पाटील यांनी सदस्यांच्या गाठीभेटी सुरूच ठेवल्या. शुक्रवारच्या बैठकीला पी. एन. शेवटच्या टप्प्यात आले. सदस्यांशी चर्चा झाल्यानंतर सर्व नेतेमंडळी मुश्रीफ यांच्या दालनामध्ये गेली. परंतु तेथे फारशी चर्चा झाली नसल्याचे समजते. त्यामुळे तेथून पी. एन. लगेचच बाहेर पडले.
चार वर्षांपूर्वीच्या निवडीवेळी गणित न जमल्याने आता मात्र पी. एन. पाटील यांच्या समर्थकांनी पी. एन. यांच्यावरच दबाव वाढविला आहे. राहुल पाटील यांच्यासाठी कोण कोण वेगळी भूमिका घेऊ शकते अशा काही सदस्यांची यादी तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
पी. एन, राजू शेट्टी यांची भेट
शासकीय विश्रामगृहावरील बैठकीनंतर शाहूपुरीतील श्रीपतरावदादा बँकेत पी. एन. आणि राजू शेट्टी यांच्यात चर्चा झाली. राहुल जर अध्यक्षपदाचे उमेदवार असतील तर शेट्टी त्यांना पूरक भूमिका घेतील, अशी या बैठकीनंतर चर्चा सुरू झाली.
पी.एन., मुश्रीफ, सतेज पाटील यांच्यात बैठकीची शक्यता
गोकुळच्या निवडणुकीमुळे जरी सतेज आणि पी. एन. एकमेकांविरोधात लढले असले तरी सतेज यांनी पी. एन. यांच्यावर एकाही ह्यशब्दाह्णने टीका केली नाही. त्यामुळेच राहुल यांना अध्यक्षपद मिळावे यासाठी पी. एन. यांनी शुक्रवारी सायंकाळी सतेज यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शनिवारी किंवा अगदीच शक्य झाले नाही तर पन्हाळ्यावर रविवारी मुश्रीफ, सतेज पाटील आणि पी. एन. यांच्यात बैठक होण्याची शक्यता आहे.