Election: ZP, पंचायत समितीमध्ये जादा २७ जणांना राजकीय संधी, आघाड्यांसाठी सदस्यवाढ ठरणार वरदान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 01:26 PM2022-05-11T13:26:40+5:302022-05-11T13:27:10+5:30
निवडणुकांचा कार्यक्रम १५ दिवसांत जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर निवडणूक आयोगाने याबाबत तातडीने हालचाली सुरु केल्या आहेत.
समीर देशपांडे
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या ९ जागा आणि पंचायत समितीच्या १८ जागा वाढणार असल्यामुळे काही तालुक्यांमधील राजकारणही बदलणार आहे. आजरा, भुदरगड, गडहिंग्लज आणि गगनबावडा या चार तालुक्यांमध्ये मात्र आहे तेवढेच गट आणि गण ठेवण्यात आले आहेत. उर्वरित आठ तालुक्यांमध्ये ही संख्या वाढत असल्याने राजकीय तडजोडीला पूरक वातावरण तयार होणार आहे.
कोल्हापूरजिल्हा परिषदेची मुदत २० मार्च रोजी संपल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तत्पूर्वी मात्र जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता होती. या निवडणुकांचा कार्यक्रम १५ दिवसांत जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर निवडणूक आयोगाने याबाबत तातडीने हालचाली सुरु केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून थेट गट व गण रचनेचा कार्यक्रमच मंगळवारी जाहीर केला.
सदस्य ६८ वरुन ७६ वर
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे याआधी ६७ सदस्य होते. मात्र वाढीव लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्यसंख्या वाढविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. त्यामुळे आठ तालुक्यांमध्ये ९ गट वाढणार असून ही संख्या आता ७६ होणार आहे, तर पंचायत समिती सदस्यांचीही संख्या १८ ने वाढणार आहे.
काय बदल होणार?
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी इच्छुकांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे विविध पक्ष आणि आघाड्यांना इच्छुकांना संधी देण्यासाठी या वाढीव जागा उपयुक्त ठरू शकतात. महाविकास आघाडी जर एकत्रितपणे लढणार असेल, तर ज्या त्या तालुक्यात ताकदीनुसार जागा देण्याचा विचार होऊ शकतो. महाविकासकडून उमेदवारी नाही मिळाली, तर भाजप त्यांना संधी देऊ शकते. थोडक्यात, राजकीय महत्त्वाकांक्षा असणाऱ्या जादा २७ जणांना यामुळे संधी मिळणार आहे.
१२ पंचायत समित्यांत १५२ जागा
जिल्ह्यातील १२ पंचायत समित्यांमध्ये याआधी १३४ सदस्य होते. परंतु ही संख्या आता १५२ वर जाणार आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी काँग्रेसकडे अनेकांनी इच्छा व्यक्त केली आहे. जिल्ह्यात एकूण सहा काँग्रेसचे आमदार असल्यामुळे ते साहजिक आहे. परंतु गृहपाठ सुरू आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर पुढची दिशा ठरवली जाईल. - सतेज पाटील, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
सध्या शिवसेनेचे १२ सदस्य जिल्हा परिषदेत आहेत. आम्ही सर्व ठिकाणाहून उमेदवार देण्याची तयारी केली आहे. मातोश्रीहून आदेश येईल, त्यानुसार आघाडी की स्वतंत्र, याचा निर्णय घेतला जाईल. - विजय देवणे, शिवसेना जिल्हाप्रमुख
जिल्हा परिषद, पंचायत समिती डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्याचा दौरा केला आहे. सर्व जागांवर लढण्याची राष्ट्रवादीची तयारी आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर जिल्हा पातळीवर कसा निर्णय होईल, त्यानुसार आघाडीबाबतचा विचार केला जाईल. - ए. वाय. पाटील जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
अजूनही निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. तरीही भाजपने तयारी सुरू ठेवली आहे. कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आणखी गती घेतली जाईल. - समरजित घाटगे, भाजप, ग्रामीण जिल्हाध्यक्ष