झेडपीची गाडी पुढं पळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:48 AM2018-11-20T00:48:35+5:302018-11-20T00:48:39+5:30
समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : दोन महिन्यांमध्ये लोकसभेची आचारसंहिता लागणार असतानाही अजून कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कामकाजाला ...
समीर देशपांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : दोन महिन्यांमध्ये लोकसभेची आचारसंहिता लागणार असतानाही अजून कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कामकाजाला म्हणावी तशी गती आलेली नाही. पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी जर ‘मिशन मोड’वर काम केले नाही, तर अनेक योजना आचारसंहितेमध्ये अडकणार आहेत.
केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या म्हणून ज्या काही योजना आहेत, त्या गतीने सुरू आहेत. मात्र ही गतीदेखील समाधानकारक नाही. पंतप्रधान घरकुल योजनेत कोल्हापूर मागे आहे. पंचगंगा प्रदूषणाच्या बाबतीत जेवढी भाषणे झाली, त्यापेक्षा जास्त काम व्हायला हवे. शासन काय करणार आहे, महापालिका काय करतेय, यापेक्षा जिल्हा परिषदेकडील उपलब्ध निधीतून गावागावांत यासाठी काय काम होणार आहे, हे महत्त्वाचे आहे. ‘नमामि पंचगंगा’ उपक्रम चर्चेत असला, तरी ठोस काम दिसण्याची गरज आहे.
गेले वर्षभर जिल्हा परिषदेचे काही महत्त्वाचे प्रकल्प चर्चेत आहेत. जिल्हा परिषदेच्या चौथ्या मजल्यासाठीच्या निधीची मागणी अध्यक्ष शौमिका महाडिक यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे केली आहे; परंतु त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत कोल्हापूर जिल्हा परिषद नसल्याचे जाणवते; त्यामुळे वेगळ्या मार्गाने का असेना, परंतु चौथ्या मजल्याचे काम सुरू करून सर्व कार्यालये एकाच इमारतीत आणण्यासाठी भूमिका घ्यावी लागेल.
‘चंदगड भवन’वरून सर्वसाधारण सभेत गोंधळ झाला होता. ही इमारत कशी असावी, यावरून मागणी करणारे सदस्य आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यात मतभेद आहेत. कोट्यवधी रुपयांची जागा इमारतीसाठी देताना तिचा बहुउद्देशीय वापर व्हावा, अशी मित्तल यांची रास्त अपेक्षा आहे; त्यामुळे हे भवन, प्रशिक्षण केंद्र, अन्य सदस्यांसाठी निवासाची उपलब्धता जे काही करायचे असेल, त्याचा एकच निर्णय घेऊन त्या दृष्टीने काम पुढे गेले पाहिजे.
भाऊसिंगजी रोडवर व्यापारी संकुल बांधण्याचा विषय गेली १५ वर्षे चर्चेत आहे. तो बºयापैकी पुढे आला आहे; मात्र सध्या तेथे असणाºया गाळेधारकांशी समन्वयाने बोलून, न्यायालयीन वाद संपवून लवकरात लवकर जिल्हा परिषदेच्या फायद्याचा करार करून, या कामाला सुरुवात होण्याची गरज आहे.
समाजकल्याण, कृषी, महिला आणि बालकल्याण विभागाच्या कोट्यवधी रुपयांच्या योजनांमधून वैयक्तिक लाभाच्या वस्तूंचे वाटप अजूनही झालेले नाही. नवीन आर्थिक वर्ष सुरू होऊन आठ महिने संपत आले, तरीही लाभार्थी निश्चित झाले नाहीत. लाभार्थी निश्चित होईपर्यंत लोकसभेची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीमधून जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांसाठी, शाळांना अध्यापन कीटसाठी, शाळा डिजिटल झाल्याने सॉफ्टवेअरसाठी विविध मार्गांनी निधी उपलब्ध करून दिला आहे; मात्र अजूनही जिल्हा परिषदेच्या विविध विकासकामांची गाडी म्हणावी तशी वेध घेताना दिसत नाही, हे वास्तव आहे.
पदाधिकाºयांमध्ये समन्वय हवा
जिल्हा परिषदेच्या सत्तारूढ पदाधिकाºयांमध्ये फारसा वाद नसला, तरी फार मोठा समन्वय आहे अशातील भाग नाही. अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी सावधपणे काम करण्याची पद्धत अवलंबली असल्याने त्यांच्याच पक्षातील अनेकजण त्यांना फार काही सांगायला जात नाहीत. महाडिक यांनीही किरकोळ वैयक्तिक तक्रारी ऐकत बसण्यामध्ये वेळ न घालवता धोरणात्मक निर्णय तातडीने होण्यासाठी कामाची पद्धत बदलण्याची गरज आहे. उर्वरित पाचही पदाधिकाºयांना सोबत घेऊन जिल्हा परिषदेच्या कामाची दिशा ठरवावी लागणार आहे. काही ठरावीक प्रकल्पांची जबाबदारी पात्र पदाधिकारी, सदस्यांवर देऊन त्याचा आढावा घेत राहणे गरजेचे आहे.
मित्तल यांना वेळ द्यावा लागेल
मित्तल यांच्या कल्पना चांगल्या आहेत, पण त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार घेऊन दोन महिने होऊन गेले आहेत. एक तर त्यांना जिल्हा परिषदेची संपूर्ण माहिती होण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. जिल्हा परिषदेची सध्याची प्रक्रिया आणि त्यांच्या कल्पना याचा मेळ घालणे अवघड आहे. त्यामुळे कोणताही प्रकल्प, योजना तयार करत असताना अध्यक्ष, सभापती, सीईओ आणि विभागाचे अधिकारी यांनी एकत्र बसून त्याची रूपरेखा ठरवण्याची गरज आहे. एकदा स्थायी समिती, सर्वसाधारण सभा अशी प्रक्रिया झाल्यानंतर जर त्यामध्ये काही बदल सुचवले गेले तर ते पुन्हा बदलणे अडचणीचे आणि वेळखाऊ ठरत आहे. त्यामुळे मित्तल यांनाही कल्पना आणि व्यवहार याची सांगड घालावी लागणार आहे.
शौमिका महाडिक
यांच्याकडून अपेक्षा
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा शौमिका महाडिक यांच्या रूपाने भाजपचा पहिला अध्यक्ष बनला आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली त्या कार्यरत आहेत, ते चंद्रकांत पाटील हे राज्याचे दुसºया क्रमांकावरचे मंत्री आहेत. महाडिक यांचे पती अमल हे आमदार आहेत. या सर्व परिस्थितीचा विचार करता उच्चशिक्षित असलेल्या शौमिका महाडिक यांच्याकडून जिल्हा परिषदेच्या विकासाच्या वेगळ्या अपेक्षा आहेत; मात्र त्या पूर्ण करण्यासाठी उर्वरित काळात त्यांना वेळ द्यावा लागणार आहे.