झेडपीची जागा दोघा भावांच्या नावावर!

By Admin | Published: October 23, 2015 11:30 PM2015-10-23T23:30:19+5:302015-10-24T00:24:15+5:30

कारभार चव्हाट्यावर : मालमत्ता वाऱ्यावर

Zp's place in the name of two brothers! | झेडपीची जागा दोघा भावांच्या नावावर!

झेडपीची जागा दोघा भावांच्या नावावर!

googlenewsNext

सांगली : अनेक मोक्याच्या जागा जिल्हा परिषदेच्या असूनही त्या माहीतच नसल्याचे मालमत्तांचा शोध घेण्यासाठी गठित केलेल्या समितीच्या चौकशीत पुढे आले. अनेक जागांवर खासगी व्यवसाय चालू असून त्यांच्याकडून भाडे वसूल होत नाही. जि. प.ची इमारतच बाळा रायाप्पा न्हावी व येसा न्हावी या व्यक्तींच्या नावावर असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. यामुळे जि. प. पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
लोकल बोर्ड असताना सांगली आणि सातारा या दोन जिल्ह्यांचा एकत्रित कारभार होता. याचे मुख्यालय सातारा येथे होते. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत अशी त्रिस्तरीय समिती गठित झाली. त्यानंतर १९६९ मध्ये जिल्हा परिषद इमारत बांधण्यासाठी जागेचा शोध घेण्यात आला होता. त्यावेळी सांगली ते मिरज रस्त्यावरील एक हेक्टर ४४ गुंठे जागा निवडण्यात आली. ही जागा बाळा रायाप्पा न्हावी व येसा न्हावी यांनी जिल्हा परिषद इमारत बांधण्यासाठी बक्षीसपत्राद्वारे दिली होती. या जागेत सध्याची प्रशासकीय इमारत बांधण्याचा निर्णय तत्कालीन पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी घेतला होता. त्यानुसार या जागेत पाच हजार ३१० चौरस मीटर बांधकाम केले होते. ही इमारत बांधण्यासाठी केवळ बारा लाख रूपयांचा खर्च आला होता. जुनी इमारतीची जागा अपुरी पडू लागल्यामुळे याच परिसरात १९९९ मध्ये नवीन दोन हजार ७९८ चौरस मीटरची इमारत बांधण्यात आली. या इमारतीसाठी एक कोटी दहा लाखांचा खर्च आला आहे. जुन्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन ४७ वर्षे झाली, तर नवीन इमारत बांधकामास १६ वर्षे झाली आहेत. एवढ्या मोठ्या इमारतींची बांधकामे करीत असताना जिल्हा परिषद प्रशासनाने एकदाही जागा कुणाच्या नावावर आहे, याचा शोध घेतला नाही. इमारत बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या मालमत्तेची सिटी सर्व्हेला नोंदही केली नाही. यामुळे जि. प. इमारतीची एक हेक्टर ४४ गुंठे जागा सिटी सर्व्हे नंबर ४५-२८८ मध्ये असून तेथे मूळ मालक बाळा रायप्पा न्हावी व येसा न्हावी यांची नावे आहेत. या व्यक्तींची नावे कमी करून जि. प.च्या नावावर ही जागा प्रशासनाने करून घेण्याची गरज होती. परंतु, याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे मूळ मालकाचे नाव लागले आहे. (प्रतिनिधी)


वारसा हक्क नाहीच
राज्य शासनाच्या आदेशानुसार वीस वर्षानंतर मूळ मालक व वारस संबंधित जागेवर भूसंपादनाचाही मोबदल्याचा हक्क सांगू शकत नाही. जिल्हा परिषदेची या जागेवर ४७ वर्षे वहिवाट असल्यामुळे कूळ कायद्यानुसार आमचाच हक्क आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडे ही जागा जिल्हा परिषदेच्या नावावर करून सिटी सर्व्हेला नाव नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे, अशी माहिती जि. प. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय माळी यांनी दिली.

Web Title: Zp's place in the name of two brothers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.