अभिमानास्पद! प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी परीक्षेत कोल्हापूरचा जुबेर मकानदार राज्यात सातवा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 12:27 PM2022-03-29T12:27:04+5:302022-03-29T12:28:00+5:30
जुबेर याने सन २०१९ मध्ये प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी आणि दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर परीक्षा दिली. मात्र, १७ गुणांनी त्याचे निवड यादीतील स्थान हुकले. त्यावर त्याने जिद्दीने तयारी करून सन २०२० मध्ये या परीक्षेसाठी पुन्हा अर्ज भरला.
कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतलेल्या प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी आणि दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर ( सिव्हिल जज्ज जुनिअर डिव्हिजन) या परीक्षेत कोल्हापूरच्या जुबेर शब्बीर मकानदार या २६ वर्षीय युवकाने राज्यात सातवा, तर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला. जिल्हा व सत्र न्यायालय कोल्हापूर येथे सध्या जुबेर वकिली करीत आहे.
येथील कदमवाडी परिसरातील डॉ. हिंदुराव घाटगे कॉलनीत राहणाऱ्या जुबेर याने सन २०१९ मध्ये प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी आणि दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर परीक्षा दिली. मात्र, १७ गुणांनी त्याचे निवड यादीतील स्थान हुकले. त्यावर त्याने जिद्दीने तयारी करून सन २०२० मध्ये या परीक्षेसाठी पुन्हा अर्ज भरला. त्यावर्षी ७४ पदांसाठी एमपीएससीने मार्चमध्ये पूर्व परीक्षा घेतली. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये मुख्य परीक्षा, तर यावर्षी दि. १७ मार्च रोजी मुलाखती होऊन दि. २४ मार्च रोजी एमपीएससीने निकाल जाहीर केला. त्यात जुबेर याने राज्यात सातवा क्रमांक मिळविला.
त्याने सेंट झेवियर्समधून शालेय शिक्षण पूर्ण केले. पुढे शहाजी लॉ कॉलेजमधून एलएलबी आणि पुणे येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवलमल फिरोदिया लॉ कॉलेज येथून त्याने एलएलएमची पदवी घेतली. त्याची सन २०१८ मध्ये शहाजी लॉ कॉलेजच्या जनरल सेक्रेटरीपदी निवड झाली होती. ॲड. शब्बीर मकानदार यांचा तो मुलगा असून कोल्हापुरातील प्रख्यात मोटार मेकॅनिक बाबूराव मकानदार यांचा नातू आहे. जुबेर याला आई वहिदा आणि बहीण नाझिया यांचे पाठबळ, तर गणेश शिरसाठ यांचे मार्गदर्शन लाभले.
न्यायाधीश होण्याचे स्वप्न उराशी बाळगून नियोजनबद्ध अभ्यास करून हे यश प्राप्त केले. यश मिळविण्यासाठी आधी पाया पक्का करणे महत्त्वाचे आहे. जिद्द, चिकाटी, मेहनत हे गुण आत्मसात केल्यास स्पर्धा परीक्षेत निश्चितपणे यश मिळविता येते. -जुबेर मकानदार