कर्जमुक्तीसाठी साडेतीन वर्षांपासून १ हजार ३११ शेतकरी सापडेनात !
By हरी मोकाशे | Published: September 8, 2023 07:02 PM2023-09-08T19:02:04+5:302023-09-08T19:02:20+5:30
शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना डिसेंबर २०१९ पासून राबविण्यात येत आहे.
लातूर : नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आणि कर्जमुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात येत आहे. मोहिमेंतर्गत कर्जमुक्त करण्यासाठी प्रशासन व बँकांकडून गेल्या साडेतीन वर्षांपासून १ हजार ३११ शेतकऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे. मात्र, त्यांचा अद्यापही पत्ताच लागला नसल्याचे दिसून येत आहे.
कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतीपिकांचे नुकसान होते. त्यामुळे शेतकरी संकटात सापडतो. सततच्या नुकसानीमुळे आणि शेतीमालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना नेहमी कर्ज काढावे लागते. परिणामी, बळीराजा कर्जबाजारी होतो. नैराश्य आणि आर्थिक ताणतणावामुळे काही वेळेस शेतकरी आपली जीवनयात्रा संपविण्याचा मार्ग अवलंबतात. या परिस्थितीचा विचार करुन शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना डिसेंबर २०१९ पासून राबविण्यात येत आहे. योजनेसाठी १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ कालावधीत अल्प मुदत पीककर्ज आणि पुनर्गठित दोन लाखांपर्यंत पीककर्ज माफ करण्यास सुरुवात झाली. योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील ६५ हजार ५५२ शेतकऱ्यांचे प्रस्ताव ऑनलाइन सादर झाले. आतापर्यंत ५८ हजार ४२६ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला आहे.
५८ हजार ५२६ शेतकऱ्यांना लाभ...
कर्जमुक्ती योजनेसाठी जिल्ह्यातील ६५ हजार ५५२ शेतकऱ्यांचे प्रस्ताव ऑनलाइन सादर करण्यात आले होते. राज्य शासनाने आतापर्यंत कर्जमाफीसाठी एकूण ७ याद्या जाहीर केल्या आहेत. त्यात ६० हजार १९६ शेतकऱ्यांची नावे आहेत. त्यापैकी ५८ हजार ८८५ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. त्यातील ५८ हजार ५२६ शेतकऱ्यांच्या खात्यावर ३४५.१९ कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत.
बँकांकडे सातत्याने पाठपुरावा...
जिल्ह्यातील ६० हजार १९६ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असले तरी प्रत्यक्षात ५८ हजार ८८५ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. जवळपास साडेतीन वर्षांपासून १ हजार ३११ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले नाही. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून बँका, सहायक निबंधक कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, या शेतकऱ्यांचा अद्यापही ठावठिकाणा लागला नाही.
काहींचा अंगठा जुळेना...
कर्जमाफीच्या लाभासाठी काही शेतकऱ्यांना अंगठा जुळत नसल्याने अडचण होत आहे. शिवाय, काही शेतकरी मयत झाले आहेत. तर काहींचे स्थलांतर झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १ हजार ३११ शेतकऱ्यांचा शोध लागत नाही. योजनेचा लाभ देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु असल्याचे दिसून येत आहे.
योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न...
कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील ६० हजार १९६ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यापैकी ५८ हजार ८८५ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. त्यातील ५८ हजार ५२६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शासनाकडून ३४५.१९ कोटींची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. उर्वरित १३११ शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून सांगण्यात आले.