अवकाळी पाऊस, गारपिटीच्या मदतीपोटी लातूर जिल्ह्यातील २२ हजार शेतकऱ्यांसाठी १० कोटी
By संदीप शिंदे | Published: April 12, 2023 08:58 PM2023-04-12T20:58:39+5:302023-04-12T21:00:02+5:30
लातूर जिल्ह्यातील १० हजार ३६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान
लातूर : जिल्ह्यात मार्च महिन्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीने रब्बी हंगामातील पिके, फळबागा आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले होते. प्रशासनाकडून तातडीने पंचनामे करीत मदतीसाठी शासनाकडे अहवाल पाठविण्यात आला होता. त्यानुसार १० एप्रिल रोजी महसूल व वनविभागाने जिल्ह्याला १० कोटी ५६ लाख ५५५ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. लवकरच ही मदत जिल्हा प्रशासनास प्राप्त होणार असून, तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.
मार्च महिन्याच्या शेवटी जिल्ह्यातील बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, गारपीट झाली होती. यामध्ये रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा, करडई, द्राक्ष, टरबूज, खरबूज, आंबा, पपईसह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले होते. तर सहा पशुधन आणि एका शेतकऱ्याचा वीज पडल्याने मृत्यू झाला होता. दरम्यान, जिल्ह्यात दुपारी गारपीट झाल्यावर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेत नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार महसूल आणि कृषी विभागाने तातडीने पंचनामे केले होते. यामध्ये २२ हजार ५६५ शेतकऱ्यांचे १० हजार ३६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार शासनाकडे १० कोटींच्या मदतीची मागणी करण्यात आली होती. शासनाने त्यास प्रतिसाद देत १० एप्रिल रोजी जिल्ह्याला १० कोटी ५६ लाख ५५ हजार रुपयांच्या निधी जाहीर केला आहे. संपूर्ण राज्यासाठी १७७ कोटी रुपये असून, मराठवाड्यासाठी ८४ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी आहे. दरम्यान, हा निधी जिल्हा प्रशासनास लवकरच प्राप्त होणार असून, निधी मिळताच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत वर्ग करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दोन दिवसांपूर्वी पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा...
जिल्ह्यात मागील दोन दिवसांपूर्वी निलंगा आणि देवणी तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे द्राक्ष आणि टरबूज पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून या नुकसानीचेही पंचनामे पूर्ण करण्यात येत आहे. पंचनामे पूर्ण झाल्यावर त्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झाल्यावर प्रशासनाने तातडीने अहवाल शासनाकडे सादर करून निधी मिळविला. त्याचप्रमाणे दोन दिवसांपूर्वी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदतीसाठी पाठपुरावा करण्याची मागणी देवणी आणि निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.