ट्रक उलटल्याने १० तास वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:03 AM2021-01-08T05:03:03+5:302021-01-08T05:03:03+5:30
मोघा : उदगीर तालुक्यातील मोघा परिसरात बुधवारी रात्री अवकाळी पाऊस झाल्याने व अरुंद रस्त्यामुळे एक ट्रक उलटला. परिणामी, या ...
मोघा : उदगीर तालुक्यातील मोघा परिसरात बुधवारी रात्री अवकाळी पाऊस झाल्याने व अरुंद रस्त्यामुळे एक ट्रक उलटला. परिणामी, या मार्गावरून परराज्यात होणारी वाहतूक गुरुवारी तब्बल १० तास ठप्प झाली होती. त्यामुळे वाहनधारकांसह प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
सध्या तोगरी- मोघा- शेल्लाळ पाटी याठिकाणी राज्यमार्ग रस्त्याचे रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या मार्गावरून तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेशात वाहतूक असते. बुधवारी मध्यरात्री अचानक या भागात अवकाळी पाऊस झाला. त्यातच मोघा गावाजवळ रस्त्याच्या मध्यभागी एक ट्रक उलटल्याने रात्री १२ वाजेपासून सकाळी १० वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक ठप्प होती. सध्या येथे रस्ता रुंदीकरण होत असल्याने व केवळ एकेरी मार्ग असल्याने वाहतूक विस्कळीत होत आहे. या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
कर्नाटकातील कमालनगर येथून महाराष्ट्रात यामार्गे सतत वाहतूक असते, तसेच उदगीरहून तेलंगणा, आंध्र प्रदेशकडेही वाहतूक असते; परंतु अवकाळी पाऊस आणि रस्ता रुंदीकरणामुळे चालकांना वाहन चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.
६ कि.मी. अधिक अंतर
रस्त्याच्या रुंदीकरणामुळे दुचाकी, तीनचाकी वाहनचालक कर्नाटकात जाण्यासाठी मोघा गावाऐवजी तोंडचीरमार्गे जात आहेत. मोघामार्गे हे अंतर १५ कि.मी. आहे, तर तोंडचीरमार्गे २१ कि.मी. आहे. त्यामुळे नाहकच ६ कि.मी.चा फटका बसत आहे. गुरुवारी सकाळी १० वा. वाहतूक सुरळीत झाली.
संबंधितांनी लक्ष द्यावे
मार्गाच्या रुंदीकरणामुळे उदगीर ते कर्नाटक राज्यात होणारी वाहतूक विस्कळीत होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन व संबंधितांनी वाहतुकीसाठी लक्ष द्यावे. जेणेकरून वाहनधारकांसह नागरिकांना त्रास होणार नाही, असे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके म्हणाले.