प्रधानमंत्री आवास योजनेतील अकराशे दहा घरांसाठी ११ कोटी १० लाखांचा पहिला टप्पा मंजूर
By हणमंत गायकवाड | Published: August 24, 2022 03:31 PM2022-08-24T15:31:54+5:302022-08-24T15:32:20+5:30
दुसऱ्या टप्प्यासाठी १७ कोटी १० लाखांचा प्रस्ताव
लातूर: प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लातूर महानगरपालिका क्षेत्रासाठी १११० घरांना मंजुरी मिळाली असून ११ कोटी १० लाख रुपयांचा राज्य शासनाकडून पहिला टप्पा प्राप्त झाला आहे. आता दुसरा टप्पा केंद्र शासनाकडून या घरकुलांसाठी १७ कोटी १० लाख रुपये मिळणार आहेत. यातून प्रत्येकी अडीच लाख रुपयांचे १११० घर बांधली जाणार आहेत. ज्यांना शहरात जागा आहे. परंतु घर नाही, अशांना ही घरे मंजूर करण्यात आली असून बांधकाम परवाना देण्याबरोबरच कामाचा आदेश देण्याची प्रक्रिया लातूर मनपाकडून सुरू झाली आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लातूर मनपाकडून अर्ज मागविण्यात आले होते. ज्यांना स्वतःची जागा आहे, परंतु छताचे घर नाही. कच्चे घर आहे.अशांकडून प्रस्ताव घेण्यात आले होते. त्यापैकी १११० घर मंजूर झाले असून या घरांसाठी प्रत्येकी अडीच लाख रुपये अनुदान मिळणार आहे. राज्य शासनाकडून एक लाख तर केंद्र शासनाकडून दीड लाख रुपये एका घराला आहेत. त्यानुसार राज्य शासनाकडून १११० घरांसाठी पहिला टप्पा ११ कोटी दहा लाख रुपयाचा प्राप्त झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात केंद्र शासनाकडून प्रत्येकी दीड लाख रुपये असे अकराशे दहा घरांना १७ कोटी १० लाख रुपये मिळणार असल्याची माहिती घरकुल योजनेचे समन्वयक वडगावे यांनी दिली.
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी या आहेत अटी...
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी शहरात स्वतःच्या जागा असावी ही प्रमुख अट आहे. त्या जागेत छताचे घर नसावे, कच्चे घर असावे. संबंधित अर्जदाराच्या कुटुंबाचे उत्पन्न तीन लाखाच्या आत असावे. या अटींची पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर केली जातात.