ड्रग्जचा ११ किलो कच्चा माल जप्त; पाच आरोपी कोठडीत
By राजकुमार जोंधळे | Updated: April 9, 2025 20:18 IST2025-04-09T20:17:44+5:302025-04-09T20:18:09+5:30
अमली पदार्थ नियंत्रण शाखेची कारवाई : एक आरोपी चाकूर तालुक्यातील

ड्रग्जचा ११ किलो कच्चा माल जप्त; पाच आरोपी कोठडीत
राजकुमार जाेंधळे, लातूर : मुंबईत वास्तव्याला असलेल्या पाच जणांनी ड्रग्जचा कच्चा माल आणून तो रोहिणा (ता. चाकूर) परिसरातील त्यांच्यापैकी एकाच्या शेतात मिक्सिंग करण्याची यंत्रणा उभारली होती. ती उद्ध्वस्त करीत एनसीबी-पोलिसांनी पाचही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. हे सर्व जण मुंबईतच ड्रग्ज विक्री करीत असून, कारवाईदरम्यान तपास यंत्रणेने ड्रग्जचा ११ किलो कच्चा माल जप्त केला.
मुंबईतील एका ड्रग्ज प्रकरणात पुणे येथील पथक एका संशयिताच्या शोधात रोहिणा परिसरात गेले होते. या प्रकरणातील पाच आरोपींपैकी एकाचे मूळ गाव चाकूर तालुक्यातील असल्याची माहिती यंत्रणेकडे होती. दरम्यान, शेतात एका शेडमध्ये ड्रग्जचा कच्चा माल आणून गुपचूपपणे तो मिक्स करून पुन्हा मुंबईकडे पोहोचविण्याचा इरादा असल्याचा अंदाज आहे. तिथे धाड टाकल्यानंतर ११ किलो कच्चा माल हाती लागला असून, पाच जणांना अटक केली.
पाच जणांना चाकूर न्यायालयात केले हजर...
प्रमोद संजीव केंद्रे (वय ३५ रा. राेहिणा ता. चाकूर), महमद कलीम शेख (रा. गोळीबार रोड, मुंबई), जुबेर हसन मापकर (५२ रा. राेहा जि. रायगड), आहाद मेमन (रा. डाेंगरी, मुंबई), अहमद अस्लम खान (रा. मुंबई) यांना चाकूर न्यायालयात बुधवारी हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन काेठडी मिळाली.
निसटण्याचा डाव फसला...
ड्रग्ज प्रकरणाच्या तपासासाठी चाकूर तालुक्यात पथक आले होते. कार (एमएच २४ एलबी १८९२) मध्ये बसून ते चाकूरहून लातूरकडे जाताना कारमधील आहाद अल्ताफखान ऊर्फ आहाद शफिक मेमन (रा. मुंबई) याने जाणीवपूर्वक कारचालकाच्या हातातील स्टेअरिंग उलटे फिरविले. कार उलटली. त्यात अधिकारी, कर्मचारी जखमी झाले. मुंबई (डोंगरी) येथील आरोपीसोबतच चाकूर तालुक्यातील एक जण आणि अन्य तिघे, अशा एकूण पाच जणांची चौकशी सुरू आहे.
ड्रग्जची किंमत किती?
शेतातील शेडमध्ये हस्तगत केलेला ड्रग्जचा कच्चा माल आहे. त्याची नेमकी किंमत किती, हे कळू शकले नाही. कच्च्या मालाचे नमुने लॅबला पाठविले जातील. त्यानंतर मुंबई-पुण्यातील अमली पदार्थ नियंत्रण शाखा त्याचे मूल्य सांगू शकेल. ड्रग्जचा हा बाजार मुंबईतील असून, आरोपी सध्या मुंबईतच वास्तव्याला आहेत. त्यातील एक मूळचा चाकूर तालुक्यातील असल्याने पुण्यातील पथक मागील आठवड्यात चौकशीसाठी जिल्ह्यात आले होते. दरम्यान, मंगळवारच्या अपघातामुळे ड्रग्ज प्रकरणाचा उलगडा झाला.