लातूर शहरात अंधाराचे राज्य, अंतर्गत रस्त्याच्या विद्युत पोलवरील १११० पथदिवे बंद !

By हणमंत गायकवाड | Published: May 22, 2024 02:02 PM2024-05-22T14:02:27+5:302024-05-22T14:05:40+5:30

विद्युत विभागाने दुरुस्तीचे काम हाती घेऊन काही सुरू झाल्या. आता सद्य:स्थितीत १११० पथदिवे बंद आहेत.

1110 street lights on electric pole of internal road in Latur city off! | लातूर शहरात अंधाराचे राज्य, अंतर्गत रस्त्याच्या विद्युत पोलवरील १११० पथदिवे बंद !

लातूर शहरात अंधाराचे राज्य, अंतर्गत रस्त्याच्या विद्युत पोलवरील १११० पथदिवे बंद !

लातूर : महानगरपालिकेचा कारभार या ना त्या कारणाने चव्हाट्यावर आला आहे. लोकनियुक्त पदाधिकारी नसल्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू आहे. होर्डिंग, युनिपोल, मान्सूनपूर्व कामाचा थांगपत्ता नाही. मुख्य रस्ते सोडले, तर प्रभागातील अनेक अंतर्गत पथदिवे बंद आहेत. शहरातील १८ प्रभागांतील १११० बल्ब बंद पडलेले आहेत. एजन्सीने काम सोडल्यामुळे ही अवस्था झाली आहे. लातूर शहरात एकूण १८ प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागात किती पथदिवे बंद आहेत, याबाबतचा सर्वे मनपाच्याच विद्युत विभागाने केला असून, ३५ वॅटचे ७७, ४५ वॅटचे ५४१, ७० वॅटचे २१९, ११० वॅटचे २४२, १४० वॅटचे २३ आणि १९० वॅटचे आठ पथदिवे बंद आहेत. मागील दोन-तीन महिन्यांपूर्वी तर बहुतांश प्रभागांतील पथदिवे बंद पडले होते. विद्युत विभागाने दुरुस्तीचे काम हाती घेऊन काही सुरू झाल्या. आता सद्य:स्थितीत १११० पथदिवे बंद आहेत.

पथदिवे दुरुस्तीचा उपक्रम हाती घ्या
मान्सूनपूर्व कामामध्ये पथदिव्यांच्या दुरुस्तीचा उपक्रम विद्युत विभागाने हाती घेणे आवश्यक आहे. महावितरण ज्या पद्धतीने मान्सूनपूर्व कामे हाती घेऊन विद्युत तारा कुठे अडकल्या नाहीत ना याची पाहणी करते. त्या धर्तीवर मनपाने बंद पथदिव्यांच्या ठिकाणी आणि जिथे बिघाड झाला आहे, अशा ठिकाणी दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक आहे. मात्र सध्या तरी या कामाकडे दुर्लक्ष दिसत आहे. शहरातील मुख्य रस्त्यावरील पथदिव्यांवर विद्युत विभागाचे लक्ष केंद्रित आहे. अंतर्गत प्रभागांमध्ये बंद असलेल्या पथदिव्यांकडे तेवढे लक्ष नसल्याने अनेक प्रभागांत लाईटची समस्या आहे.

देखभाल दुरुस्तीच्या कामाचा बोजा
पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी शासनाकडून एक एजन्सी नियुक्त होती. परंतु, संबंधित एजन्सीने काम सोडल्यामुळे मनपाच्या विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांवर देखभाल दुरुस्तीच्या कामाचा बोजा वाढला आहे. त्यामुळे शहरातील मुख्य ठिकाणची कामे करून अंतर्गत रस्त्यावरील पथदिवे सुरू करण्याला थोडा विलंब झाला होता. परंतु, बहुतांश प्रभागातील पथदिवे सुरू करण्यात आली आहेत. काही अपवादात्मक ठिकाणी पथदिवे बंद आहेत. ते दुरुस्त केले जात असल्याचे विद्युत विभागातून सांगण्यात आले.

बंद असलेले बल्ब :
३५ वॅटचे ७७ बंद
४५ वॅटचे ५४१
७० वॅटचे २१९
११० वॅटचे २४२
१४० वॅटचे २३
१९० वॅटचे ८

Web Title: 1110 street lights on electric pole of internal road in Latur city off!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.