लातूर जिल्ह्यात तीन महिन्यांत ११२ व्यक्तींना सर्पदंश; तत्काळ उपचार मिळाल्याने अनर्थ टळला
By हणमंत गायकवाड | Published: July 28, 2023 06:44 PM2023-07-28T18:44:50+5:302023-07-28T18:45:06+5:30
सर्पदंश झाल्यानंतर तत्काळ उपचार घेणे आवश्यक आहे.
लातूर : जिल्ह्यामध्ये वर्षभरामध्ये ५५४ व्यक्तींना सर्पदंश झाला असून या सर्वच व्यक्तींना रुग्णालयामध्ये तात्काळ उपचार भेटल्याने अनर्थ टळला आहे. एप्रिल ते जून या तीन महिन्यात सर्वाधिक ११२ जणांना सर्पदंश झाला आहे. विशेष करून या तीन महिन्यांमध्येच साप बाहेर येण्याचे प्रमाण अधिकचे असते. त्यामुळेच माणसांच्या संपर्कात येऊन ते चावण्याच्या घटना घडतात.
सर्पदंशाच्या घटना वाढत असल्याने आरोग्य प्रशासनाने उपचारासाठी मुबलक साठा उपलब्ध केला आहे. विषारी साप चावल्यानंतर कुठल्या औषध लागते. त्या सर्व औषधांचा साठा रुग्णालयाने उपलब्ध करून ठेवला आहे. ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेच विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात सर्पदंशावर उपचार करण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. जून, जुलै महिन्यामध्ये तसेच खरीप पीक काढणीच्या वेळी सर्पदंश होण्याच्या घटना वाढत असतात. या पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासनाने औषधांची वाढीव मागणी केली आहे, जिल्हा शैल्य चिकित्सक कार्यालयातून सांगण्यात आले. सर्पदंश झाल्यानंतर तत्काळ उपचार घेणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तीला सर्पदंश झाला, त्याला धीर देऊन तत्काळ दवाखाना गाठायला हवा. गैरसमज जास्त असल्याने भीतीमुळेच धोका होण्याची शक्यता असते. त्यामुळे तत्काळ उपचार घ्यावे.
सर्पदंश झाल्यानंतर काय करायला हवे...
मोकळा स्वच्छ जागेत हलवावे.सर्पदंश झालेल्या व्यक्तीला धीर द्यावा, पायी चालणे, जास्त बोलणे टाळावे,विषारी साप हाताला चावला असेल तर दंडाला दोरीने बांधून आवळून घ्यावे, विषारी साप पायाला चावला असेल तर मांडीला दोरीने बांधून आवळून घ्यावे.
आवळपट्टी बांधताना दंड व दोरीच्या मध्ये पेन, काडी किंवा बोट चाकून बांधावे बांधल्यानंतर ते बाहेर काढावे, दर १५ ते २० मिनिटांनंतर १५ सेकंदांसाठी सोडावा व पुन्हा त्याच पद्धतीने बांधावा, सर्पदंश झालेल्या व्यक्तीला चहा, कॉफी किंवा दारू पाजू नये.
दंश झालेल्या जागेवर चिरा किंवा काप घेऊ नये त्यामुळे जास्तीचा रक्तस्राव होऊन व्यक्ती दगावण्याची शक्यता असते,दवाखान्यात जातांना शक्यतो फोनवर डॉक्टरांना कळवावे.
तत्काळ मदत करता येईल, दंश झालेल्या व्यक्तीला दमा किंवा ॲलर्जी अथवा एकादा आजार असल्यास डॉक्टरांना कळवावे.
सुरक्षित जागेच्या शोधात असतात साप...
पावसाळा सुरु होण्याच्या काळात बऱ्याच जातीच्या सापांचा प्रजनन काळ असतो. त्याचबरोबर साप राहत असलेल्या बिळामध्ये पाणी साचते. त्यामुळे भक्ष्य व लपण्यासाठी सुरक्षित जागेच्या शोधात साप जुन- ऑगस्ट या कालावधीत मानवी वस्तीच्या आसपास आढळून येतात.
या काळात नागरिकांनी साप दिसला तर घाबरुन न जाता.या आपातकालीन परिस्थीची शास्त्रीय माहिती घ्यायला हवी. घाबरून न जाता समोरे जायाला हवे, सर्प मित्रांनी सांगितले.
प्रजनन काळ आणि पाऊस एकदाच येत असल्याने बाहेर साप पडतात. यावेळी सर्पदंश होऊ शकतो.