११६ गावांना मिळणार नळाचे शुद्ध पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:55 AM2021-02-20T04:55:09+5:302021-02-20T04:55:09+5:30

अहमदपूर : तालुक्‍यातील १२२ पैकी ११६ गावांमध्ये जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठ्याचे काम सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे मार्च २०२४ अखेर ...

116 villages will get pure tap water | ११६ गावांना मिळणार नळाचे शुद्ध पाणी

११६ गावांना मिळणार नळाचे शुद्ध पाणी

Next

अहमदपूर : तालुक्‍यातील १२२ पैकी ११६ गावांमध्ये जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठ्याचे काम सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे मार्च २०२४ अखेर प्रत्येकास शुद्ध पाणी मिळणार आहे. त्यातील सहा गावांचा समावेश मुख्यमंत्री पेयजल योजनेत करण्यात आला आहे.

सर्वांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे म्हणून तालुक्यातील १२२ गावांत सर्वेक्षण करण्यात आले. त्यातील ११६ गावांत जल जीवन मिशनअंतर्गत तर ६ गावांत मुख्यमंत्री पेयजल अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यात येणार आहे. याबाबत सर्व गावांचा सर्व्हे करण्यात आला असून त्याची विभागणी दोन भागांत करण्यात आली आहे. पहिल्या भागात ज्या गावात किरकोळ दुरुस्ती करून अथवा शिल्लक नळजोडणी करून पाणीपुरवठा करण्यात येतो, त्यासाठी ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगांतर्गत बंदिस्त निधीतून व जल जीवन मिशनचा निधी खर्च करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. तसेच ज्या गावात अद्याप पाणीपुरवठा योजना नाही अथवा जुनी योजना बंद पडली आहे, ती कार्यान्वित करणे, त्याचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी ७० गावांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये अंदाजपत्रकानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.

तालुक्यातील ६ गावांची मुख्यमंत्री पेयजल योजनेमध्ये निवड करण्यात आली असून त्याचे काम पूर्णत्वास जात आहे. त्यात देवकरा, दगडवाडी, कोळवाडी, हिंगणगाव या प्रादेशिक योजनांचे काम प्रगतिपथावर असून सावरगाव थोट व तीर्थ या गावांचे काम पूर्ण होत आहे. या ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोग व जलजीवन मिशनचा निधी मिळणार आहे. तो केवळ पाणीपुरवठ्यावर खर्च करण्यात येणार आहे. याबाबतचे सर्व अंदाजपत्रक व माहिती पाणीपुरवठा विभागाच्या उपविभागीय अभियंत्याच्या वतीने तयार करण्यात येत आहे.

दरम्यान, पेयजल योजनेसंदर्भात अनेक गावांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील थोडगा व बेलूर येथील काम प्रलंबित असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत योग्य ती चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

९ हजार नळ जोडणीचे उद्दिष्ट...

मार्चअखेरपर्यंत सर्वच गावांतील उपलब्ध योजनेनुसार ९ हजार नळजोडण्या देण्याचे उद्दिष्ट होते. त्यातील ६ हजार ८७८ नळ जोडण्यांचे काम पूर्ण झाले असून जवळपास ७६ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम येत्या मार्चअखेर पूर्ण होणार आहे.

कामात अनियमिततेची तक्रार...

केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून होणाऱ्या कामात काही ठिकाणी अनियमितता आढळून आली आहे. याबाबत उपविभागीय अभियंत्याकडे तक्रार दाखल झाली असून त्याची चौकशी करावी, अशी मागणी थोडगा येथील अमोल पाटील व बेलूरचे प्रशांत पुणे यांनी केली आहे.

Web Title: 116 villages will get pure tap water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.