सीआरपीएफचे ११९ जवान देशसेवेसाठी सज्ज; लातूरच्या प्रशिक्षण केंद्रात दिक्षांत समारंभ उत्साहात
By संदीप शिंदे | Updated: August 6, 2024 16:40 IST2024-08-06T16:39:40+5:302024-08-06T16:40:39+5:30
सर्व जवानांना ४४ आठवड्यांचे कठोर मुलभूत प्रशिक्षण देण्यात आले.

सीआरपीएफचे ११९ जवान देशसेवेसाठी सज्ज; लातूरच्या प्रशिक्षण केंद्रात दिक्षांत समारंभ उत्साहात
लातूर : येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्रात मंगळवारी ३० वा दिक्षांत समारंभ पार पडला. याप्रसंगी ४४ आठवड्यांचे कठोर प्रशिक्षण यशस्वी पूर्ण करुन ११९ जवान देशसेवेसाठी सज्ज झाले आहेत.
दिक्षांत समारंभास सीआरपीएफचे पोलीस उपमहानिरीक्षक तथा प्राचार्य अमीरुल हसन अन्सारी, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, डिप्युटी कमाडंट सुदीप वाकचौरे आदींसह सीआरपीएफचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी परडेमध्ये देशभरातील विविध राज्यामधून निवडलेले ११९ प्रशिक्षणार्थी सहभागी होते. यात ६ महिलांचा समावेश असून, सर्व जवानांना ४४ आठवड्यांचे कठोर मुलभूत प्रशिक्षण देण्यात आले. यात दहशतवादाचा मुकाबला कसा करावा, घेराबंदी, शोधमोहीम, नक्षलवादी, दहशतवाद्यांवर छापे याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले.
लातूर येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्रातून ३० बॅच पूर्ण झाल्या असून, ९ हजार ५५६ जवानांनी आतापर्यंत प्रशिक्षण पूर्ण केले आहे. दिक्षांत समारोप कार्यक्रमात प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते जवानांना रँक तसेच पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यामध्ये काॅन्स्टेबल जी.बी.एल. वीग्नेस यांचा सन्मान करण्यात आला. जवानांनी विविध प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. यावेळी सीआरपीएफचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.