लातुरात मोठी कारवाई, पोलिसांना सतत गुंगारा देणाऱ्या १२ आराेपींना अटक!
By राजकुमार जोंधळे | Published: December 9, 2022 07:19 PM2022-12-09T19:19:18+5:302022-12-09T19:19:38+5:30
चाकूर, अहमदपूर ठाण्यांच्या हद्दीत मध्यरात्री कोंबिंग ऑपरेशन
लातूर : जिल्ह्यातील ३५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका हाेत असून, त्याअनुषंगाने कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पाेलिसांनी चाकूर आणि अहमदपूर उपविभागात मध्यरात्री काेम्बिंग ऑपरेशन केले. दरम्यान, सलग दाेन दिवस करण्यात आलेल्या कारवाईत पाेलिसांना सतत गुंगारा देणाऱ्या बारा जणांना अटक करण्यात आली आहे. तर अवैध दारूविक्रीप्रकरणी पाच गुन्हे दाखल केले आहेत.
पाेलिसांनी सांगितले, निवडणूककाळात शांतता रहावी, यासाठी पाेलीस अधीक्षक साेमय मुंडे यांनी दिलेल्या आदेशानंतर ७ आणि ८ डिसेंबर राेजी रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत सहायक पाेलिस अधीक्षक निकेतन कदम यांच्या पथकाने चाकूर आणि अहमदपूर पाेलिसांकडून दाेन्ही उपविभागात काेम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. अहमदपूर आणि चाकूर उपविभागात ५ अधिकारी आणि २७ अंमलदारांची स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली हाेती.
लाॅज, हाॅटेलवर पाेलिसांचा छापा...
पाेलीस पथकाने केलेल्या काेम्बिंग ऑपरेशनमध्ये अवैध शस्त्र जप्ती, अग्निशस्त्रे जप्ती, फरार आरोपी अटक करणे, लॉज आणि हॉटेलची तपासणी करणे, पॅरोलवर बाहेर असलेल्या मात्र, पॅराेलच्या आदेशाचा उल्लंघन करणाऱ्या आरोपींचा शोध घेणे, वाहन तपासणे, रेकाॅर्डवरील गुंड, गुन्हेगारांचा शोध घेणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करणे आदी कारवाई करण्यात आली.
१३ अट्टल गुन्हेगारांची घेतली झडती...
अहमदपूर आणि चाकूर उपविभागातील लाॅजेस, हाॅटेलची तपासणी करण्यात आली. न्यायालयाकडून काढण्यात आलेल्या, सतत पाेलिसांना चकवा देत फरार असलेल्या एकूण १२ आराेपींना वाॅरंट बजावत अटक करण्यात आली आहे. नाकाबंदी करुन संशयित वाटणाऱ्या वाहनांची तपासणी करणयात आली आहे. पाेलिस ठाण्यांच्या रेकाॅर्डवरील सराईत १३ गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. शिवाय, अवैध दारूविक्री करणाऱ्यावर पाच स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.