लातूरमध्ये एसटीच्या प्रवासात गर्दीत सापडले १२१ फुकटे प्रवासी
By आशपाक पठाण | Published: July 16, 2023 05:41 PM2023-07-16T17:41:03+5:302023-07-16T17:41:19+5:30
मे महिन्यात लग्नसराई, सुट्ट्याचा हंगाम असल्याने सर्वाधिक ३३ प्रवासी फुकट प्रवास करताना सापडले आहेत.
लातूर : राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी. प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांना एसटीच्या पथकाने शोधून कारवाई केली आहे. मागील सहा महिन्यात तब्बल १२१ फुकटे प्रवासी आढळून आले आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मे महिन्यात लग्नसराई, सुट्ट्याचा हंगाम असल्याने सर्वाधिक ३३ प्रवासी फुकट प्रवास करताना सापडले आहेत.
रेल्वेच्या तुलनेत एस.टी. बसमध्ये प्रवाशांची संख्या मर्यादीत असली तरी गर्दीच्या हंगामात सर्रासपणे वाहकाची नजर चुकवून काहीजण मोफत प्रवास करीत असतात. त्यामुळेच महामंडळाच्या पथकाकडून अनेकदा बसमधील प्रवाशांची अचानक तिकिट तपासणी केली जाते. जानेवारी ते जून सहा महिन्यात पथकाने केलेल्या वाहन तपासणीत तब्बल १२१ फुकटे प्रवासी सापडले असल्याची माहिती वाहतूक नियंत्रक अभय देशमुख यांनी दिली.
गर्दीत साधली जाते संधी...
उन्हाळ्यात लगीनसराई, शाळांना सुट्ट्या असल्याने एस.टी.ला प्रवाशांची गर्दी अधिक असते. त्यातच लांब पल्ल्याच्या बसपेक्षा ठराविक अंतरावर धावणाऱ्या बसमध्ये तुलनेत मोफत प्रवासाची संधी साधणारे काही भाग असतात. एप्रिल आणि मे महिन्यात सर्वधिक फुकटे प्रवासी आढळून आले आहेत. त्यात एप्रिल महिन्यात २४, मे महिन्यात ३३ प्रवाशांचा समावेश आहे.
विनातिकिट आढळलेले प्रवासी
महिना प्रवासी दंड
जानेवारी १४ ४३१९
फेब्रुवारी १७ २५२०
मार्च १६ २५५०
एप्रिल २४ ३१४३
मे ३३ ३७८८
जून १७ १७६५
१२१ जणांकडून १८ हजाराचा दंड...
एस.टी. तपासणीत फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शोधून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. लातूर आगाराच्या पथकाने मागील सहा महिन्यात १२१ फुकट्या प्रवाशांना पकडले आहे. त्यांच्याकडून १८ हजार ८५ रूपये दंड वसूल केला आहे. प्रवाशांनी बसमध्ये बसताच वाहकांकडे तिकिट काढून घ्यावे. गर्दी असली तरी फुकट प्रवासाचा प्रयत्न करू नये. वाहन तपासणीसाठी एस.टी.पथक नेहमी या ना त्या मार्गावर फिरत असते. - अभय देशमुख,वाहतूक नियंत्रक.