सव्वा काेटींची रक्कम वाचली! तिजोरीच्या चाव्या चोराला बँकेतच भेटल्या, त्याने प्रयत्न केला पण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2022 06:15 PM2022-02-16T18:15:56+5:302022-02-16T18:16:25+5:30
लातुरात साेलापूर सिद्धेश्वर बँक फाेडण्याचा प्रयत्न फसला
लातूर : शहरातील गुळ मार्केट परिसरात असलेल्या साेलापूर सिद्धेश्वर बँकेचे शटर ताेडून प्रवेश करत, बँकेची तिजाेरी फाेडण्याचा प्रयत्न केला. मात्र यात यश आले नाही. ही घटना बुधवारी पहाटे ३.३० ते ४ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत गांधी चाैक पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरातील गूळ मार्केट परिसरात साेलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेची शाखा आहे. तिजाेरीमध्ये जवळपास १ काेटी २५ लाखांची राेकड हाेती. बुधवारी पहाटे ३.३० ते ४ च्या सुमारास चाेरट्याने बँकेच्या शटर व चॅनल गेटचे कुलूप ताेडून आत प्रवेश केला. दरम्यान, बँकेतील तिजाेरीची चावी घेऊन ती उघडण्याचा प्रयत्न केला. तिजाेरीला दाेन चाव्या लावल्याशिवाय उघडता येत नाही. चाेरट्याने बराच वेळ प्रयत्न करूनही तिजाेरी उघडली नाही. त्यामुळे चाेरट्याने तेथून काढता पाय घेतला. या सर्व हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. चाेरट्याने अंगामध्ये जरकीन व ताेंडाला बांधून आत प्रवेश केल्याचे ३.५७ वाजता सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे. बँक फाेडण्याचा प्रयत्न किमान दाेन ते चार चाेरट्यांनी केला असावा, असा संशय पाेलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबत बँकेच्या व्यवस्थापकाने दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्वानपथक जाग्यावरच घुटमळले...
घटनास्थळी अप्पर पाेलीस अधीक्षक अनुराग जैन, लातूर शहर उपविभागीय पाेलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, पाेलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकाेडे यांनी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, सकाळी श्वानपथक बाेलावण्यात आले मात्र, ते जाग्यावरच घुटमळले. शिवाय, ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले हाेते. चाेरट्यांच्या शाेधासाठी पाेलीस पथके तैनात करण्यात आली आहेत.
तिजाेरीच्या चाव्या बँकेतच...
बँक बंद झाल्यानंतर तिजाेरीच्या चाव्या संबंधितांनी सुरक्षितपणे ठेवण्याची गरज हाेती. मात्र, त्या चाव्या बँकेतच ठेवण्यात आल्या हाेत्या. बँकेतील दैनंदिन घडामाेडींची माहिती घेत चाेरट्याने हा प्रयत्न केल्याचे समाेर आले आहे. बँकेतच ठेवलेल्या चावीने तिजोरी उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र ताे फसल्याने जवळपास सव्वा काेटींची रक्कम वाचली. विशेष म्हणजे बँक सुरक्षेबाबत गंभीर नसल्याचे या घटनेवरुन समाेर आले आहे.
- जितेंद्र जगदाळे, पाेलीस उपविभागीय अधिकारी, लातूर