लातूर जिल्ह्यात घरपट्टी, पाणीपट्टीचे १३ काेटी ६६ लाख थकित!
By हरी मोकाशे | Published: March 14, 2024 05:38 PM2024-03-14T17:38:29+5:302024-03-14T17:39:02+5:30
जिल्हा परिषद : गावागावांत विशेष कर वसुली पंधरवाडा
लातूर : प्रत्येक गावांतील नागरिकांना मुलभूत सोयी- सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ग्रामपंचायतींकडून घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीवर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले जाते. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने मिशन स्वाभिमान मोहीमही राबविण्यात आली. त्यामुळे वसुलीस गती मिळाली असली तरीही आणखीन १३ कोटी ६६ लाख ११ हजारांची थकबाकी शिल्लक आहे. ती वसूल करण्यासाठी आता विशेष कर वसूली पंधरवाडा राबविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
प्रत्येक गावच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने अधिकाधिक निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. मात्र, नियम, अटी आणि काही तांत्रिक बाबींमुळे गावातील सर्व भागांचा अपेक्षित विकास साधणे अडचणीचे ठरते. अशावेळी पाणीपट्टी, घरपट्टी कर वसुली अत्यंत महत्त्वाची ठरते. त्यातून ग्रामपंचायतीही आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होते.
जिल्ह्यात एकूण ७८६ ग्रामपंचायती आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतींची घरपट्टी, पाणीपट्टीची शंभर टक्के वसूली व्हावी म्हणून जिल्हा परिषदेचे सीईओ अनमोल सागर यांच्या संकल्पनेतून मिशन स्वाभिमान मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे अधिकाधिक कर वसूली झाली आहे.
एकूण कर : ६२,५६,२४,०००
आतापर्यंतची वसुली : ४८,९०,१३,०००
थकित रक्कम : १३,६६,११,०००
पावणेचार कोटींच्या घरपट्टीची थकबाकी...
तालुका - थकित रक्कम
अहमदपूर - ५७ लाख ४७ हजार
औसा - ५० लाख ७ हजार
चाकूर - ३१ लाख २२ हजार
देवणी - २० लाख ५४ हजार
जळकोट - १३ लाख ९३ हजार
लातूर - ६९ लाख ८२ हजार
निलंगा - ५७ लाख ६१ हजार
रेणापूर - २२ लाख ५२ हजार
शिरुर अनं. - ११ लाख ६२ हजार
उदगीर - ३७ लाख ५२ हजार
एकूण - ३ कोटी ७२ लाख ३२ हजार
पाणीपट्टीपोटीच्या १० कोटी रुपयांच्या वसुलीचे आव्हान...
तालुका - थकित रक्कम
अहमदपूर - ६७ लाख ४८ हजार
औसा - १ कोटी ३८ लाख
चाकूर - ४८ लाख ९९ हजार
देवणी - २२ लाख २२ हजार
जळकोट - १६ लाख ९३ हजार
लातूर - ८२ लाख ३४ हजार
निलंगा - १ कोटी ११ लाख
रेणापूर - ४० लाख ५३ हजार
शिरुर अनं. - २० लाख ७८ हजार
उदगीर - ६८ लाख ७४ हजार
एकूण - ९ कोटी ९३ लाख
विभागीय आयुक्तांनी व्यक्त केली नाराजी...
जिल्ह्यात विशेष कर वसुली मोहीम राबवून ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, फेब्रुवारी अखेरपर्यंत कर वसुलीचे प्रमाण ७० टक्क्यांपेक्षा कमी दिसून येत असल्याने विभागीय आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कर वसुली ही ग्रामपंचायतीची नियमित बाब व मुलभूत कर्तव्य असल्याचे स्पष्ट केले आहे.
कर वसुलीसाठी विशेष मोहीम...
ग्रामपंचायतींची १३ कोटी ६६ लाखांची कर वसुली थकित आहे. त्यासाठी १५ ते ३१ मार्च हा कालावधी विशेष कर वसुली पंधरवाडा म्हणून राबविण्याच्या सूचना बीडीओंना केल्या आहेत. शंभर टक्के कर वसुलीचे नियोजन करावे.
- दत्तात्रय गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत.