पावणेतीन लाख शेतकऱ्यांनी भरला १३ कोटींचा पीकविमा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 06:14 PM2019-01-04T18:14:25+5:302019-01-04T18:14:59+5:30
रबी हंगाम : गतवर्षीच्या तुलनेत भरला दुप्पट पीकविमा
लातूर : प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत डिसेंबर अखेर रबी पिकासाठी २ लाख ७२ हजार २०१ शेतकऱ्यांनी १२ कोटी १५ लाख १६ हजार रुपयांचा पीकविमा जिल्हा बँकेच्या विविध शाखांमध्ये भरला आहे. पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांचे हाल होत असताना बँकेने नियोजनबद्ध पद्धतीने पीकविमा जमा केल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट पीकविमा जमा झाला आहे.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्ह्यात एकूण ११७ शाखा आहेत. पीकविमा भरण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत होती. त्यामुळे बँकेने नियोजनबद्ध पद्धतीने पीकविमा शेतकऱ्यांकडून संकलित केला. गतवर्षी २०१७ मध्ये १ लाख ४५ हजार ७०९ शेतकऱ्यांनी ६ कोटी ४३ लाख ८५ हजार रुपयांचा रबी पिकाचा पीकविमा भरणा केला होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुपटीने म्हणजे १ लाख २६ हजार ४९२ शेतकर्यांनी ६ कोटी ५१ लाख ३१ हजार रुपयांचा जादा पीकविम्याचा भरणा केला असल्याची माहिती जिल्हा बँकेचे चेअरमन श्रीपतराव काकडे यांनी दिली. जिल्हा बँकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सुटीच्या दिवशीही शेतकऱ्यांचा पीकविमा भरुन पीकविम्याचे संकलन केले. राज्यात ३५ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत. यात पीकविमा भरून घेण्यात लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आघाडीवर आहे. पीकविमा भरून घेण्यातही बँकेने लातूर पॅटर्न निर्माण केला आहे.
तालुकानिहाय भरलेल्या शेतकऱ्यांचा पीकविमा...
लातूर तालुक्यात ४१ हजार १२४ शेतकऱ्यांनी २ कोटी १ लाख ४२ हजार, औसा ४९ हजार १२६ शेतकऱ्यांनी २ कोटी ५० लाख ८६ हजार, चाकूर ३० हजार १२८ शेतकऱ्यांनी १ कोटी ४४ लाख ३३ हजार, रेणापूर २२ हजार ९७४ शेतकºयांनी १ कोटी १३ लाख ५२ हजार, अहमदपूर ३० हजार २९४ शेतकऱ्यांनी १ कोटी ५२ लाख २८ हजार, उदगीर १६ हजार १३५ शेतकऱ्यांनी ६९ लाख ४९ हजार, निलंगा ४८ हजार ३५५ शेतकऱ्यांनी २ कोटी २१ लाख ५९ हजार, जळकोट ६ हजार ८२१ शेतकऱ्यांनी २३ लाख ३५ हजार, देवणी १२ हजार ३३६ शेतकऱ्यांनी ५१ लाख ९४ हजार आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यातील १४ हजार ८९० शेतकऱ्यांनी ६६ लाख ३८ हजार रुपयांचा रबीचा पीकविमा भरला. जिल्ह्यात एकूण २ लाख ७२ हजार २०१ शेतकऱ्यांनी १२ कोटी ९५ लाख १६ हजार रुपयांचा पीकविमा भरला आहे.