कुष्ठरोगमुक्ती सर्वेक्षणात लातूर जिल्ह्यात आढळले नवीन १३ रुग्ण
By हरी मोकाशे | Updated: December 27, 2024 20:06 IST2024-12-27T20:06:17+5:302024-12-27T20:06:26+5:30
अतिजोखीम भागात मोहीम : ३४ हजार व्यक्तींची तपासणी

कुष्ठरोगमुक्ती सर्वेक्षणात लातूर जिल्ह्यात आढळले नवीन १३ रुग्ण
लातूर : थुंकी, खोकला, शिंकण्यामुळे हवेतून पसरणाऱ्या कुष्ठरोगाचे उच्चाटन करण्यासाठी जिल्ह्यात कुसूम अभियान राबविण्यात आले. याअंतर्गत अतिजोखमीच्या भागातील ३३ हजार ९५५ व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात नवीन १३ कुष्ठरुग्ण आढळून आले आहेत.
सन २०२७ पर्यंत कुष्ठरोग नष्ट करण्याचे केंद्र शासनाचे धोरण आहे. त्यानुसार जिल्ह्यात १६ ते २७ डिसेंबर या कालावधीत अतिजोखमीच्या भागात कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसूम) अभियान हाती घेण्यात आले होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, कुष्ठरोग विभागाच्या सहाय्यक संचालक डॉ. विद्या गुरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
याअंतर्गत वीटभट्टी, बांधकाम मजूर, स्थलांतरित व्यक्ती, कंपनीतील कामगार, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. जिल्ह्यातील २९१ उपेक्षित ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित करुन जवळपास ३३ हजार ९५५ व्यक्तींची शारीरिक तपासणी करण्यात आली. त्यात १३ नवीन रुग्ण आढळून आले.
जिल्ह्यात एकूण १९२ रुग्ण...
अभियानअंतर्गतच्या तपासणीत आश्रमशाळा व वसतीगृहात- ६, वीटभट्टीवर- २, स्थलांतरित व्यक्तीच्या तपासणीत ५ असे एकूण १३ नवीन कुष्ठरुग्ण आढळले आहेत. दरम्यान, एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत १७९ कुष्ठरुग्ण आढळले आहेत. सध्या जिल्ह्यात एकूण १९२ कुष्ठरुग्ण असून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येत आहेत.
कुष्ठरोगाची ही लक्षणे...
त्वचेवर फिकट/ लालसर बधीर चट्टा, तेलकट गुळगुळीत चकाकणारी त्वचा, कानाच्या जाड पाळ्या, त्वचेवर गाठी, भुवयाचे केस विरळ हाेणे, डोळे पूर्णपणे बंद करता न येणे, हाता- पायाला मुंग्या येणे, हाता- पायाची बोटे वाकडी असणे, हाता- पायाला अशक्तपणा जाणवणे अशी कुष्ठरोगाची लक्षणे आहेत.
लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या...
कुष्ठरोग हा संसर्गिक आणि असंसर्गिक आजार आहे. तो हवेतून पसरतो. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. लक्षणे दिसताच तात्काळ नजिकच्या शासकीय रुग्णालयात तपासणी करुन घ्यावी. तपासणी व उपचार मोफत करण्यात येतो.
- डॉ. विद्या गुरुडे, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग).