लातूरातील जुन्या १३ जीर्ण इमारतींना सील ! वापरण्यास प्रतिबंध
By हितेंद्र.सिताराम.काळुंखे | Published: July 24, 2023 05:27 PM2023-07-24T17:27:13+5:302023-07-24T17:32:43+5:30
इर्शाळवाडीत दरड कोसळून अनेकांना जीव गमवावा लागला, या पार्श्वभूमीवर लातूर मनपा प्रशासन सतर्क झाले आहे
लातूर : शहरातील सूळ गल्ली, लाड गल्ली, राम गल्ली, जैन गल्ली, माळी गल्ली, तिवारी बोळ आदी परिसरात जुने वाडे व काही इमारती पडीक झाल्या आहेत. या इमारती कोणत्याही क्षणी पडण्याची शक्यता असल्याने महानगरपालिकेने सील केले आहे. या परिसरातील एकूण १३ जीर्ण इमारती सील करण्यात आल्या आहेत.
इर्शाळवाडीत दरड कोसळून अनेकांना जीव गमवावा लागला, या पार्श्वभूमीवर लातूर मनपा प्रशासन सतर्क झाले असून, जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींनाच सील करण्यात येत आहे. गावभागातील १३ इमारती सोमवारी सील करण्यात आल्या. त्यात सूळ गल्ली, लाड गल्ली, जैन गल्ली, राम गल्ली, माळी गल्ली आदी ठिकाणच्या जीर्ण इमारतींचा समावेश आहे.
महानगरपालिकेच्या वतीने त्या ठिकाणी फलक लावण्यात आले असून, गेल्या दोन-तीन दिवसांच्या रिमझिम पावसामुळे या इमारतीच्या भिंती फुगलेल्या आहेत. चिरेबंदीवाडा टाइप असलेली दगड-मातीची ही घरे कधीही कोसळू शकतात. त्यामुळे मनपाने या ठिकाणी फलक लावला आहे. या इमारतींना वापरण्यास प्रतिबंध केला आहे.
या पथकाने केली कारवाई
क्षेत्रीय अधिकारी बंडू किसवे, स्वच्छता निरीक्षक आक्रम शेख, हिरा कांबळे, देवेंद्र कांबळे या कर्मचाऱ्यांच्या पथकाने वापरण्यास बंदीचे फलक संबंधित ठिकाणी लावले आहे. इमारतीवर वापरण्यास प्रतिबंध असल्याच फलक डकविला आहे.