लातूरातील १३ शाळा ‘पीएम-श्री’ योजनेत; अनुभवात्मक पद्धतीने मिळणार भविष्यवेधी शिक्षण
By संदीप शिंदे | Published: March 31, 2023 06:03 PM2023-03-31T18:03:28+5:302023-03-31T18:04:12+5:30
‘पीएम-श्री’ योजनेंतर्गत शाळांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे.
लातूर : राज्य शासनाने पीएम श्री योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात लातूर जिल्ह्यातील १३ शाळांना मान्यता दिली आहे. विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून या शाळांचा आदर्श शाळा म्हणून विकास होणार असून, पाच वर्षांसाठी या शाळांना पावनेदोन कोटी रुपये मिळणार आहेत.
शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रधानमंत्री स्कूल्स फॉर राइझिंग इंडिया अर्थात ‘पीएम-श्री’ योजनेंतर्गत शाळांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. याअंतर्गत उच्च दर्जाचे गुणात्मक अन् भविष्यवेधी शिक्षण देण्यासाठी जिल्ह्यातील २५२ शाळांची निवड करण्यात आली आहे. या योजनेतून शाळा सर्वोत्कृष्ट ठरविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. विशेषत: निवड झालेल्या प्रत्येक शाळेस १ कोटी ८८ लाख रुपयांची तरतूद पाच वर्षांसाठी करण्यात येणार असून, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी या शाळांमध्ये केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १३ शाळांची निवड करण्यात आली असून, याबाबतची यादी शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. राज्याकडुन सुचना मिळताच या योजनेची अंमलबजावणी होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
केंद्र आणि राज्य शासन उचलणार खर्च....
पीएम श्री योजनेत सहभागी होण्यासाठी राज्य शासनाने केंद्रासोबत करार केला असून, करारानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यात येणार आहे. योजनेत केंद्राचा ६० टक्के तर राज्याचा ४० टक्के वाटा राहील. प्रत्येक शाळेसाठी १ कोटी ८८ लाख रुपयांची तरतूद पाच वर्षांसाठी करण्यात येणार आहे. त्यामुळे निवड झालेल्या शाळांचा सर्वांगीण विकास होणार असून, विद्यार्थ्यांना तंत्रस्नेही शिक्षण मिळणार आहे.
विद्यार्थ्यांना मिळणार आनंददायी शिक्षण...
निवड झालेल्या या शाळांमधून विद्यार्थ्यांना अनुभवात्मक पद्धतीने आनंददायी शिक्षण देण्यात येईल. वैचारिक समज आणि जीवनातील त्याचा ज्ञानाचा वापर आणि योग्यतेवर आधारित मूल्यांकन होईल. शाळांचा भौतिक विकास होणार असून, पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १३ शाळांची निवड झाली आहे. दरम्यान, राज्य आणि केंद्र शासनाकडून सुचना मिळताच या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.