लातूरमधून शिक्षण घेतलेले १,३०० विद्यार्थी मेडिकलला, राज्यातील एकूण प्रवेशापैकी २० टक्के प्रमाण
By राजकुमार जोंधळे | Published: September 5, 2023 04:39 PM2023-09-05T16:39:57+5:302023-09-05T16:43:11+5:30
संपूर्ण प्रवेश प्रक्रिया अंतिम होईपर्यंत हा आकडा १५०० विद्यार्थ्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
लातूर : लातूरमधून बारावी बोर्डाची तसेच नीटच्या लातूर केंद्रावरून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमधून सुमारे १३०० विद्यार्थी शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयात गुणवत्तेनुसार प्रवेशास पात्र ठरले आहेत.
वैद्यकीय महाविद्यालयाची दुसरी प्रवेश फेरी पूर्ण झाली असून, संपूर्ण प्रवेश प्रक्रिया अंतिम होईपर्यंत हा आकडा १५०० विद्यार्थ्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सीईटी सेलच्या अधिकृत आकडेवारीनुसार बारावी बोर्डाची परीक्षा लातूर जिल्ह्यातून दिलेले ५८० विद्यार्थी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशपात्र ठरले आहेत. त्यामध्ये लातूरच्या नीट केंद्रावरून तसेच लातूरबाहेरील केंद्रावरून परीक्षा दिलेले परंतु नीटची तयारी लातूरमधून केलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी समाविष्ट नाही. शहरातील कौन्सिलर सचिन बांगड यांनी केलेल्या विश्लेषणानुसार लातूरमधून शिक्षण घेऊन मेडिकलला लागलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १३०० वर आहे. प्रवेश प्रक्रिया अंतिम होईपर्यंत तो आकडा आणखी दोनशेने वाढू शकेल.
यासंदर्भात सचिन बांगड म्हणाले, राज्यातील प्रत्येक पाच विद्यार्थ्यांमागे वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशित झालेला एक विद्यार्थी लातूरचा राहील असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. प्रामुख्याने लातूर जिल्ह्यातून शिक्षण घेतलेल्या व वैद्यकीय प्रवेशाला पात्र ठरलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ७० टक्के विद्यार्थी लातूरच्या नीट केंद्रावरून परीक्षा दिलेले, तर ३० टक्के विद्यार्थी इतर केंद्रांवरून नीट परीक्षा दिलेले, परंतु त्यांनी तयारी लातूरमधून केलेली आहे असे दिसून येते.
लातूरमधून सर्वाधिक प्रवेश...
बारावी बोर्ड परीक्षा त्या-त्या जिल्ह्यात दिलेल्या विद्यार्थ्यांनुसार पुणे ७३९, मुंबई ६०८, लातूर ५८०, ठाणे ४४८, अहमदनगर ४३८, नागपूर ४३५, नांदेड ३६२, सोलापूर ३४८, अकोला ३०५ आणि औरंगाबाद २८० विद्यार्थ्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळविला आहे. परंतु, ही आकडेवारी बोर्ड परीक्षा दिल्यानुसार असून, नीट परीक्षा केंद्रनिहाय आकडेवारीचे विश्लेषण केल्यास लातूरमधून सर्वाधिक विद्यार्थी मेडिकलला जात आहेत. दोन्ही ठिकाणी राज्यभरातून विद्यार्थी नीटच्या तयारीसाठी येतात. मेडिकलला प्रवेशित हाेणाऱ्या प्रत्येक पाचपैकी एक विद्यार्थी हा लातूरचा आहे.