एचआयव्ही बाधित १३५ मातांनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:16 AM2021-01-14T04:16:42+5:302021-01-14T04:16:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : गेल्या सहा वर्षांमध्ये १४० पैकी १३५ एचआयव्ही बाधित मातांनी गोंडस निगेटिव्ह बाळांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : गेल्या सहा वर्षांमध्ये १४० पैकी १३५ एचआयव्ही बाधित मातांनी गोंडस निगेटिव्ह बाळांना जन्म दिला आहे. वेळेत तपासणी, औषधोपचार आणि जनजागृतीमुळे हे यश आले आहे. १४० पैकी ५ बालके तपासणीत पाॅझिटिव्ह आढळली आहेत.
२०२० मध्ये एप्रिल ते डिसेंबरअखेर १८ बाधित मातांनी बाळांना जन्म दिला. यातील १८ ही बाळांची तपासणी करण्यात आली असून, ही बालके निगेटिव्ह आणि गोंडस आहेत. २०१९-२० मध्ये २० एचआयव्ही बाधित मातांनी जन्म दिला. या सर्व मातांची बालके एचआयव्ही तपासणीत निगेटिव्ह आहेत. २०१८-१९ मध्ये २२ मातांपैकी तिघींचे बाळ तपासणीत पाॅझिटिव्ह आढळले. १९ बालके निगेटिव्ह आणि गोंडस आहेत. २०१७ मध्येही २२ एचआयव्ही मातांनी २२ गोंडस बाळांना जन्म दिला. २०१५-१६ आणि २०१६-१७ मध्ये प्रत्येकी २९ मातांनी बाळांना जन्म दिला. यातील प्रत्येकी एक बालक पाॅझिटिव्ह आले आहे.
तपासणी आणि औषधोपचार वेळेत हवे
गरोदर मातांची तपासणी आणि औषधोपचार वेळेत आणि नियमित होणे अपेक्षित आहे. प्रसूती रुग्णालयातच झाली पाहिजे. बाधित मातांनी एआरटीचे उपचार नियमित घेतले पाहिजेत. त्यामुळे जन्मणारे बाळ निगेटिव्ह हाेते.
गरोदर महिलांनी अशी घ्यावी काळजी
गरोदर मातांनी डाॅक्टरांकडून नियमित तपासणी करुन घेतली पाहिजे. एचआयव्ही तपासणी करणेही आवश्यक आहे. गरोदरपणात सकस आणि पाैष्टिक आहार, व्यायाम, योगा आणि ज्या मातांना बेड रेस्ट सांगितली आहे, त्यांनी डाॅक्टरांच्या सुचनेनुसार आहार आणि उपचार घेतले पाहिजेत. प्रत्येक महिन्याला प्राथमिक आरोग्य केंद्र आणि स्थानिक डाॅक्टरांकडे जाऊन आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे.