‘नीट’साठी पैसे देणारे १४ जण अडकले चौकशीच्या फेऱ्यात; काेट्यवधी जमविण्याचे नियाेजन
By राजकुमार जोंधळे | Published: June 27, 2024 05:20 AM2024-06-27T05:20:41+5:302024-06-27T05:20:59+5:30
काेट्यवधी जमविण्याचे नियाेजन : २२ जणांसाेबत झाली बाेलणी
लातूर : नीट गुणवाढीसंदर्भात ॲडव्हान्स पैसे देणारे १४ पालक-विद्यार्थी आता पाेलिस चाैकशीच्या फेऱ्यात अडकले असून, पहिल्या टप्प्यात पाच ते सहाजणांची पाेलिसांकडून कसून चाैकशी करण्यात आली आहे. त्यांचे जबाबही नाेंदवून घेण्यात आले आहेत. आता उर्वरित पालक-विद्यार्थ्यांचा शाेध पथकाकडून घेतला जात आहे. नीट प्रकरणात लातुरातील शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापक व शिक्षकाला अटक झाली असून, इरण्णा काेनगलवार आणि दिल्लीतील गंगाधर मात्र पाेलिसांच्या हाती अद्याप लागला नाही. पाेलिसांच्या काेठडीत असलेला जलीलखाॅ पठाण, संजय जाधव यांच्या चाैकशीतून दरराेज नवनवीन खुलासे समाेर येत आहेत. दाेघांच्या चाैकशीत एकूण २२ पालक-विद्यार्थ्यांची नावे समाेर आली आहेत. त्यातील १४ जणांचे पत्ते, ओळख पटली असून, दाेन दिवसांत पाच ते सहा जणांची चाैकशीही पूर्ण झाली आहे.
पालक-विद्यार्थी जबाबात काय म्हणाले?
पाेलिस पथकाने चाैकशीसाठी पाचारण करण्यात आलेल्या पालक-विद्यार्थ्यांचे जबाब नाेंदवून घेण्यात आले आहेत. पाेलिसांना दिलेल्या जबाबात पालकांनी म्हटले आहे, जलीलखाॅ पठाण आणि संजय जाधव यांनी गुणवाढीसंदर्भात आमच्याकडून ॲडव्हान्स म्हणून पैसे घेतले हाेते. काम न झाल्याने त्यांनी पैसेही परत केले आहेत.
काेट्यवधींचा व्यवहार करायचे हाेते नियाेजन...
गुणवाढीसंदर्भातील कामासाठी काही पालकांकडून पाच लाख, तर काहीकडून दहा लाख रुपयांची बाेलणी करण्यात आली हाेती. त्यासाठी ॲडव्हान्स म्हणून दाेघा शिक्षकांनी एकाकडून ५० हजार रुपये घेतल्याची माहिती समाेर आली आहे. यातून काेट्यवधींचा व्यवहार करण्याचे नियाेजन आखण्यात आले हाेते. मात्र, काम न झाल्याने हा व्यवहार बिनसला.
सूत्रधार गंगाधरचा मुक्काम नाेएडामध्ये...
गंगाधर हा मूळचा महाराष्ट्रातील सांगली-सातारा भागातील रहिवासी असल्याची माहिती आता समाेर आली आहे. ताे सध्या दिल्लीतील नाेएडात एका ऑटाेमाबाईल्स शाेरूममध्ये नाेकरी करत असून, इरण्णा काेनगलवार याच्याशी त्याची हैदराबाद येथे भेट झाल्याचा तपशील बाहेर आला आहे. या भेटीतील घडामाेड मात्र अद्यापही समाेर आली नाही.