लातुरात रेल्वे काेच फॅक्टरीच्या ३३ केव्ही कामात दीड काेटींची बनावट बिले!
By राजकुमार जोंधळे | Published: October 10, 2022 07:25 PM2022-10-10T19:25:06+5:302022-10-10T19:27:31+5:30
मराठवाडा रेल्वे काेच फॅक्टरीच्या नवीन ३३ के.व्ही. लाईनच्या कामासाठी लेखी करार करून न देता आर्थिक फसवणूक केली.
लातूर : येथील अतिरिक्त एमआयडीसी परिसरात उभारण्यात आलेल्या मराठवाडा रेल्वे काेच फॅक्टरीच्या नवीन ३३ के.व्ही. लाईनच्या कामासाठीचा लेखी करार करून न देता फिर्यादीची १ काेटी ४६ लाख ३९ हजार ७५६ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना २०१९ ते नाेव्हेंबर २०२० दरम्यान घडली. याबाबत शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात तिघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, व्यवस्थापकीय संचालक विजयकुमार हरिभाऊ बारकूल (वय ४३ रा. राम नगर, औसा रोड लातूर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की. हरंगुळ परिसरातील अतिरिक्त एमआयडीसीत उभारण्यात आलेल्या मराठवाडा रेल्वे काेच फॅक्टरीच्या नवीन ३३ के.व्ही. लाईनच्या कामासाठी लेखी करार करून न देता आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशाने २८ फेब्रुवारी २०१९ ते २९ नाेव्हेंबर २०२० दरम्यान खरेदी केलेल्या साहित्याची बनावट, बाेगस आणि खाेटी बिले तयार करून ते महावितरण कंपनीला देण्यात आलेल्या देयकाला जाेडून हे देयक मंजुरीसाठी शासनाला पाठवून फिर्यादीची मुकेश हिराचंद हेबाडे (४१ रा. जुना औसा राेड, लातूर), जमीर अमीर पाशा शेख (रा. लातूर) आणि सईद तकुल्ला सईद जफरुल्ला कादरी (रा. कलबुर्गी, कर्नाटक) यांनी संगनमत करून तब्बल १ काेटी ६४ लाख ३९ हजार ७५६ रुपयांची आर्थिक फसवणूक केली. शिवाय, महावितरण कंपनीची दिशाभूल केली. असे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत विजयकुमार बारकूल यांनी दिलेल्या जबाबावरून शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात तिघांविराेधात गुन्हा दाखल केला आहे. तपास पाेलीस निरीक्षक दिलीप डाेलारे करत आहेत.